लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलावर 21 जून रोजी भव्य आंतरराष्ट्रीय योग महोत्सव

 लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलावर 21 जून रोजी भव्य आंतरराष्ट्रीय योग महोत्सव

·       योग दिनी सकाळी 6 वाजता रॅलीचे आयोजन


लातूर
दि. 19 (जिमाका): येथील जिल्हा क्रीडा संकुलावर बुधवारी, 21 जून 2023 रोजी सकाळी 6 ते 8 या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्यावतीने नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पतंजली योगपीठ परिवार, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व सुप्रभात ग्रुप यांच्यासह अनेक सेवाभावी संस्था या भव्य योग महोत्सवात सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांसाठी हा कार्यक्रम निःशुल्क असून जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून सुमारे दहा हजार योगसाधक एकाच वेळी योग करू शकतील, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शिक्षण विभाग, महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यरत आहे. ‘योग फॉर वसुधैव कुटुंबकम’ ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम असून ‘हर घर-अंगण योग’ ही टॅगलाईन आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 6 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी चौक मार्गे ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप होईल. जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी सोबत आसन (बेडशीट) आणावे, असे आवाहन करण्यत आले आहे.

जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिन

जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये 21 जून रोजी प्रत्येक तालुका, शहर, गाव येथे आंतरराष्ट्रीय योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व आरोग्यवर्धिनी, आरोग्य उपकेंद्रे याठिकाणीही योग दिन साजरा होईल. तरी नागरिकांनी आपल्या गावातील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु