जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत देवणी गोवंश संवर्धन योजनेंतर्गत दुग्धस्पर्धेचे आयोजन
जिल्हा परिषद पशुसंवर्धन
विभागामार्फत
देवणी गोवंश संवर्धन
योजनेंतर्गत दुग्धस्पर्धेचे आयोजन
लातूर, दि. 01 (जिमाका): सन
2023-24 मध्ये देवणी गोवंश संवर्धनासाठी जिल्हा परिषद उपकर योजनेतून देवणी
जातीच्या गायींच्या दुग्धस्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. एप्रिल 2023 मध्ये
विलेल्या व जानेवारी 2024 पर्यंत विणे अपेक्षित असलेल्या सर्व गायींची नोंदणी या
स्पर्धेसाठी करता येईल. दुग्धस्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज
सर्व पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी आणि पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध राहतील,
पशुपालकांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित पशुधन विकास अधिकारी किंवा पशुवैद्यकीय
दवाखान्याच्या संस्थाप्रमुखाकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव
यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त दुध
उत्पादन देणाऱ्या देवणी जातीच्या गाईचे संवर्धन करण्यासाठी देवणी गोवंश संवर्धन
राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये देवणी
जातींच्या गायींची दुग्धस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये
प्रतिदिन सहा लिटरपेक्षा अधिक दुध देणाऱ्या गाईच्या पशुपालकांना यामध्ये सहभागी
होता येईल. देवणी जातीच्या जातीवंत गुणधर्म असलेल्याच गायींची दुग्ध स्पर्धा, वर्षातून 2 वेळा घेण्यात येईल. दुग्ध स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्यागाईची आयएनएपीएच
प्रणालीमध्ये टॅग नंबरसह नोंदणी बंधनकारक असेल. वैइंग मशीनव्दारे दुग्ध स्पर्धेतील
सहभागी देवणी गायीच्या दुग्ध उत्पादनाची नोंद करण्यात येईल.
प्राथमिक स्तरावर 6 लिटरपेक्षा जास्त
दुध देणाऱ्या देवणी गाईची दुग्ध नोंदणी पशुवैद्यकीय संस्था स्तरावर संबधित
संस्थाप्रमुख व पशुपालक यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर तालुकास्तरावर आठ दिवसात
6 लिटरपेक्षा अधिक दुध देणाऱ्या देवणी गाईची निवडसाठी समितीमार्फत
दुग्धस्पर्धाच्या निकषानुसार पशुपालकांच्या दारातच दुग्ध उत्पादनाच्या नोंदी
घेण्यात येतील. द्वितीय नोंदीच्या आधारावर तालुक्यातून प्रत्येक फेरीस प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रुपये दहा हजार, रुपये सात हजार व पाच हजार पाचशे रुपये असे बक्षीस देण्यात येईल. गाईच्या
पशुपालकास डीबीटीव्दारे बक्षिसाचे वितरण केले जाईल, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment