राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण वंचितांना सामाजिक न्याय देण्याचे कार्य राजर्षि शाहू महाराजांनी केले -खासदार सुधाकर शृंगारे

 

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

वंचितांना सामाजिक न्याय देण्याचे कार्य राजर्षि शाहू महाराजांनी केले




-         खासदार सुधाकर शृंगारे

लातूर, दि. 26 (जिमाका): राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील वंचित घटकाला आरक्षण देवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या समाज घटकासाठी काम करण्यासाठी पाठबळ दिले. त्यामुळे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेतील योगदान अतिशय महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले.

राजर्षि छत्रपती शाहू महाराज चौक  येथे लातूर शहर महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी खासदार श्री. शृंगारे बोलत होते.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार तिरतसिंह रावत, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष विनोद गोटीया, माजी खासदार सुनील गायकवाड, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे, उपायुक्त मयुरा शिंदेकर यांची यावेळी उपस्थिती होती.

राजर्षि शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात असावा, यासाठी 2015 पासून प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नातून महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात नऊ फुटी पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून त्याचे अनावरण आज होत असल्याचे खासदार श्री. शृंगारे म्हणाले. तसेच राजर्षि शाहू महाराज यांचे विचार आजही सर्वांसाठी मार्गदर्शक असून त्या विचारांचा अंगीकार सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, असा राजर्षि शाहू महाराज यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी विविध कायदे करून, वसतिगृहे उभारून शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. राजर्षि शाहू महाराज हे सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते, समाजातील अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारल्याबद्दल माजी खासदार सुनील गायकवाड यांनी महानगरपालिकेचे आभार मानले.

राजर्षि शाहू महाराज यांचे कार्य शब्दात मांडता येत नाही. सर्वसामान्य गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, वंचित समाज बांधवांच्या हितासाठी राज्यकारभार करणाऱ्या या राजाने सदैव सामाजिक समतेचा संदेश दिला. अशा लोकराजाचा पुतळा लातूर शहरात उभारण्यात आला आहे. हा अतिशय सुंदर आणि देखणा पुतळा लातूरच्या सुपुत्राने तयार केला असून ही लातूरकरांसाठी आनंदाची बाब असल्याचे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.

सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आजही राजर्षि शाहू महाराज यांचे कार्य आदर्शवत ठरणारे आहे. नवीन पिढीने त्यांच्या कार्याचा आदर्श घेवून त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले. तसेच आपण राजर्षि शाहू महाराजांच्या जीवनावर चिंतन करत असताना सामाजिक सुधारणा आणि समतेची प्रेरणा घेऊया ! अन्यायाला आव्हान देऊन शिक्षणाचा प्रसार करून उपेक्षितांना सशक्त बनवूया. तसेच प्रत्येक व्यक्तीला प्रगतीच्या समान संधी असलेल्या समाजाला प्रोत्साहन देऊन राजर्षि शाहू महाराजांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन आमदार श्री. देशमुख यांनी केले.

राजर्षि शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे लातूरच्या वैभवात भर पडणार असून त्यांचे विचार लातूरकरांना सतत प्रेरणा देणारे ठरतील, अशी भावना आमदार आमदार अमित देशमुख यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली. तो संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला.

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे शिल्पकार दिनेश लोखंडे यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले. सूत्रसंचालन मिर्झा शेख गालिब यांनी केले. महानगरपालिका उपायुक्त मयुरा शिंदेकर यांनी आभार मानले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु