राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लातूर येथे सोमवारी समता दिंडीचे आयोजन
राजर्षी शाहू
महाराज जयंतीनिमित्त
लातूर येथे
सोमवारी समता दिंडीचे आयोजन
लातूर, दि. 23 (जिमाका): राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा
करण्यात येतो. त्यानिमित्त 26 जून 2023
रोजी सकाळी साडेसात वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथून समता दिंडीचे
आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या
हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समता दिंडीला
सुरुवात होईल.
राजर्षी शाहू महाराज पुतळा, शाहू चौक,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गे समता दिंडी काढण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) दिंडीचा समारोप होईल. समता दिंडीच्या
माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी घटनेतील
विविध अनुच्छेद, जसे कायद्यासमोर समानता, भेदभाव प्रतिबंध, अस्पृश्यता प्रतिबंध, अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचे अधिकारी व कर्तव्याची माहिती देण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती
शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित व्याख्याने, पोवाडे, भाषणे इत्यादींच्या माध्यमातून
सामाजिक न्यायाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या
जयंतीनिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन येथे सकाळी साडेदहा वाजता होणार असल्याचे समाज कल्याण विभागाने कळविले
आहे.
****
Comments
Post a Comment