‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’ मोहिमेस प्रारंभ


·        शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषि विभागाचा पुढाकार

·        आधुनिक तंत्रज्ञान, रोग नियंत्रण, योजनांविषयी होणार मार्गदर्शन

लातूर, दि. 07 (जिमाका) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’ मोहीम जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. निलंगा तालुक्यातील सिंदखेडामध्ये विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात झाली.

प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे, सरपंच रावसाहेब अंबिलपुरे,  कृषि महाविद्यालयाचे कृषि विद्यावेत्ता प्रा. डॉ. अरुण गुट्टे, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र काळे, मंडळ कृषि अधिकारी सुनील घारुळे, कृषि सहायक श्री. ननावरे, आत्माचे करमचंद राठोड, तुकाराम सुगावे यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत खरीप पिकांचे आधुनिक लागवड तंत्रज्ञान, गावात राबविण्यात येणारे विस्तार विषयक प्रकल्प, पिकावरील किड व रोग नियंत्रण (शंखी गोगलगाय व पैसा) आणि कृषि विभागाच्या प्रमुख योजनांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

खरीपासाठी बियाणे खरेदी करताना, पेरणी करताना शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पेरणी केल्यास उत्पन्नात वाढ होते. सध्या कृषि विद्यापीठाने किमान 80 ते 100 मिलीलीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याबाबत शिफारस केली आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच शेतकऱ्यांनी रुंद वरंबा व सरी पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी केले.

कृषि महाविद्यालयाचे कृषि विद्यावेत्ता प्रा. डॉ. अरुण गुट्टे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच या पंचसूत्रीबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले.

सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया याविषयी मंडळ कृषि अधिकारी सुनील घारुळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्री. सुगावे यांनी केले, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र काळे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा