लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या बांधकामाची चौकशी करण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आदेश

 

लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या बांधकामाची

चौकशी करण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आदेश

·        बांधकाम, साहित्याच्या दर्जाविषयी व्यक्त केली नाराजी

*लातूर, दि. 22 (जिमाका)*: अनुसूचित जाती मुलांसाठी लामजना येथे उभारण्यात आलेल्या शासकीय निवासी शाळेच्या बांधकामची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. समाज कल्याण विभागाच्यावतीने या शाळेसाठी बारा कोटी रुपये निधी देण्यात आला होता.

लामजना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलांची शासकीय शाळेच्या इमारतीची  समाज कल्याण आयुक्तांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी तेथील बांधकाम, तसेच इतर साहित्य नित्कृष्ट दर्जाचे आढळून आल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. इमारतीसाठी वापरण्यात आलेल्या सिमेंटचा दर्जा नित्कृष्ट असून पुरविण्यात आलेले कॉट, जेवणाचे टेबल, फरशी इत्यादी साहित्य तसेच इमारतीस लावण्यात आलेल्या रंगाच्या दर्जाबाबत समाज कल्याण आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

शासकीय विश्रामगृहात बुधवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी लामजना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलांची शासकीय शाळेच्या बांधकामाच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी समिती नेमावी. चौकशीचा अहवाल तात्काळ समाज कल्याण विभागास सादर करण्याच्या सूचना दिल्या.

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष शिबिरे घेण्याच्या सूचना

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत शिक्षणाधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन विदयार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालय स्तरावर शिबिरे घेवून जात पडताळणी प्रमाणपत्राचे शाळेतच वितरण करावे. तसेच निवडणुकीमधील उमेदवारांच्या जात पडताळणीसाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करावे. विशेष मोहीम राबवून जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या.

ऊसतोड कामगार ओळखपत्र वितरणाचा आढावा

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्याशी समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी चर्चा केली. ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करणे, आरोग्यशिबिरांचे आयोजन तसेच साखर कारखान्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या प्रश्न सोडविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, लातूरचे सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते, उस्मानाबादचे सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभिम शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडे, मुख्याध्यापक दत्‍तात्रय मुखम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु