भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मे पर्यंत अंतिम मुदत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या
अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मे पर्यंत अंतिम मुदत
लातूर, दि. २० : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांना या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० मे २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही जागांअभावी किंवा अन्य कारणांमुळे प्रवेश मिळवू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक असलेली रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येते.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या कालावधीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर नवीन किंवा नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत, परंतु ज्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, त्यांचे अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी त्यांच्या 'विद्यार्थी लॉगिन'ला परत पाठविण्यात आले आहेत.
संबंधित विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या लॉगिनवर जाऊन अर्जातील त्रुटी तपासाव्यात आणि ३० मे २०२६ पूर्वी आवश्यक त्या कागदपत्रांची किंवा माहितीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सादर करावा, असे आवाहन लातूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****
Comments
Post a Comment