औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद; रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे 'अन्न व औषध प्रशासन' विभागाचे आवाहन

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद; रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवण्याचे 'अन्न व औषध प्रशासन' विभागाचे आवाहन लातूर, दि. १८ : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आगामी बुधवार, २० मे २०२६ रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून, या बंदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील रुग्णांची व नागरिकांची औषधांविना गैरसोय होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे. लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पत्रान्वये या संपामध्ये संघटनेच्या सभासदांनी सहभागी होऊ नये, अशी विनंती प्रशासनामार्फत १४ मे २०२६ रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून ज्या रुग्णांना नियमित औषधोपचारांची आवश्यकता आहे, अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी बंदच्या कालावधीत होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांनी केले आहे. या बंदच्या कालावधीत जर एखाद्या गरजू रुग्णाला तातडीने औषध उपलब्ध झाले नाही किंवा अत्यावश्यक औषधांची गरज भासली, तर नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांच्या ८२७५१७५२३२ किंवा औषध निरीक्षक श्रीमती स्वा. क. कुपकर यांच्या ८८३०८०१८०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर थेट संपर्क साधावा. व्यापक जनहित आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व स्थानिक वृत्तपत्रांनी या आवाहनाला प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून रुग्णांची होणारी गैरसोय टाळता येईल, अशी विनंती अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्हा माहिती कार्यालयाला करण्यात आली असून या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी, लातूर आणि सह आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, छत्रपती संभाजीनगर यांनाही सविनय सादर करण्यात आली आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन