खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी ‘अमृत’ संस्थेतर्फे मोफत ड्रोन प्रशिक्षण

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी ‘अमृत’ संस्थेतर्फे मोफत ड्रोन प्रशिक्षण · प्रशिक्षणानंतर अधिकृत 'ड्रोन पायलट परवाना'ही मिळणार लातूर, दि. १८ (जिमाका): आजच्या आधुनिक काळात शेती, फोटोग्राफी, सर्वेक्षण, सुरक्षा यांसह अनेक तांत्रिक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सामान्यतः ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत 'ड्रोन पायलट परवाना' देखील दिला जाणार आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. याच अंतर्गत संस्थेने ‘अमृत ड्रोन मिशन’ हा उपक्रम हाती घेतला असून, त्याद्वारे हे ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ राज्यातील अनेक युवक घेत असून, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी १० दिवसांचा असून, यादरम्यान उमेदवारांच्या राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण व्यवस्था 'अमृत' संस्थेमार्फत मोफत केली जाणार आहे, तसेच प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिला जातो, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांचा लाभ मिळत नाही. यामध्ये सद्यस्थितीत ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा समावेश आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच त्याचे वय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि तो किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, अर्जासोबत वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी '१ ला मजला, पितृछाया बिल्डिंग, मयूरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प, विद्यानगर, लातूर - ४१३५१२' या पत्त्यावर किंवा ७३९१०६५४७० या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन