खादी व ग्रामोद्योग मंडळाचा मधुमित्र पुरस्कार लातूरच्या ज्ञानेश्वर मलीले यांना जाहीर
- छत्रपती
संभाजीनगर येथे 20 मे 2026 रोजी होणार पुरस्कारांचे वितरण
लातूर, दि. 18 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिले
जाणारे 2026 सालचे ‘मधुमित्र’ व ‘मधु-सखी’ पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलीले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहिर झाले
आहेत. याशिवाय निवड समितीने ठाण्याचे चंद्रकांत तरे, पुण्याचे संजय मारणे, कोल्हापूरचे दयावान पाटील आणि जळगावचे विद्यानंद आहिरे यांची विशेष
सन्मानासाठी निवड केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग
मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी दिली.
महाराष्ट्र
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या ‘मधाचे गाव’ तसेच जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने योजलेला ‘मधु मित्र – मधु सखी पुरस्कार’ तसेच मंडळाच्या विविध कार्याविषयीची सभापती साठे यांनी दिली. यावेळी मुख्य
कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य
कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.
‘मधु मित्र’ आणि ‘मधु सखी’ पुरस्काराचे वितरण 20 मे 2026 या जागतिक मधमाशी दिनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित
कार्यक्रमात होणार असल्याचे सांगून सभापती साठे म्हणाले की, महाराष्ट्रातील मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने 2023 पासून ही पुरस्कार योजना सुरू केली आहे. या पुरस्कारामध्ये
स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.
राज्यात
मधमाशीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या मध संचालनालयामार्फत प्रशिक्षण, जनजागृती मेळावे, मध महोत्सव, ‘मधाचे गाव’ योजना
तसेच मधुमित्र-मधुसखी पुरस्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सभापती
साठे यांनी सांगितले. ‘मधाचे गाव’ योजनेसाठी
राज्य शासनाने 17 कोटी रुपयांची तरतूद केली असून पहिल्या टप्प्यात दहा
जिल्ह्यांतील दहा गावांमध्ये काम सुरू झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत 348 मधपाळांना प्रशिक्षण देण्यात आले असून 1750 मधपेट्या, संरक्षण
पोशाख, मध यंत्र आणि अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.
या योजनेमुळे
निसर्ग संवर्धन, मध उत्पादनवाढ, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचा
विश्वास साठे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेली 65 वर्षे कार्यरत असून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आणि मध केंद्र योजना
यांची अंमलबजावणी मंडळामार्फत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी
उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन लक्षात घेऊन मंडळाने “हर घर खादी, घर घर खादी” ही मोहीम सुरू
केली असल्याचेही सभापती साठे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेली
खादी वस्त्रे, हातकागदापासून बनविलेल्या वस्तू, गणेशमूर्ती तसेच मधापासून तयार होणारी सौंदर्यप्रसाधने नागरिकांनी मोठ्या
प्रमाणावर खरेदी करावीत, असे
आवाहन सभापती साठे यांनी केले.
राज्यात पारंपरिक मध उत्पादनाला चालना
देण्यासाठी शासनाने 12 मधगावांना मान्यता दिली असून त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील
घोलवड, नांदेड जिल्ह्यातील भंडारवाडी, नंदुरबार जिल्ह्यातील बोरझर, हिंगोली
जिल्ह्यातील काकडदाभा, नाशिक जिल्ह्यातील चाकोरे, अहिल्यानगर जिल्ह्यातील उडदावणे, परभणी जिल्ह्यातील शेलमोहा, वर्धा
जिल्ह्यातील सिंधीविहीर, सातारा
जिल्ह्यातील सालोशी, अमरावती जिल्ह्यातील आमझरी, धुळे जिल्ह्यातील रामी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तळवडे या गावांचा समावेश
आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मध उत्पादकांना बाजारपेठ, प्रशिक्षण व आर्थिक सक्षमीकरणाची संधी उपलब्ध होणार
असल्याची माहिती सभापती साठे यांनी यावेळी दिली.
पीएम
विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 27,529 ऑनबोर्डेड ग्रामपंचायतींतील प्रशिक्षणासाठी नोंदणीकृत 2,45,026 लाभार्थी असून कर्ज वितरण आर्थिक लाभार्थ्यांची संख्या 53,593 असल्याचे सांगत सभापती साठे यांनी 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
अंतर्गत राज्यात 5,791 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती दिली.
यासाठी 9723.18 लाख रूपयांचे मार्जिन मनी मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रम अंतर्गत 1,078 प्रकल्पांसाठी 2021.98 लाख रूपयांचे मार्जिन मनी वितरित करण्यात आले असून या
माध्यमातून 8,624 रोजगार निर्मिती झाली आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1,625 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून 5947.5लाख रुपयांचे मार्जिन मनी वितरित करण्यात आले असल्याचे सभापती साठे यांनी
सांगितले.
0000
Comments
Post a Comment