पाणी पुरवठा व जल जीवन मिशनच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा
पाणी पुरवठा व जल जीवन मिशनच्या कामांचा
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा
लातूर, दि. २० : जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनसह पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा घेतला. या योजनांच्या कामांसह पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण, पुनर्भरण आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छताचे उपमुख्य कार्यकारी मोहन अभंगे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास प्राधिकरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या योजनांना गती द्यावी. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. पाणी पुरवठा योजनांचे जलस्रोत कायमस्वरूपी कार्यरत राहण्यासाठी या योजनांच्या जलस्रोतांचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, मृद व जलसंधारण विभाग आणि लघु पाटबंधारे विभागांनी जलस्त्रोतांमधील गाळ उपसा करणे, विहिरी व विंधन विहिरींचे पुनर्भरण यासारखे उपक्रम हाती घ्यावेत. यामध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. तसेच जल जीवन मिशन, पाणी पुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या.
ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता श्री. शेलार यांनी जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
****
Comments
Post a Comment