लातूरच्या संजिवनी नागमोडे यांना राज्य शासनाचा 'जिजामाता कृषिभूषण पुरस्कार' प्रदान!

लातूरच्या संजिवनी नागमोडे यांना राज्य शासनाचा 'जिजामाता कृषिभूषण पुरस्कार' प्रदान! लातूर, दि. १० : पारंपरिक शेतीला आधुनिकता, सेंद्रिय पद्धती आणि पूरक व्यवसायांची जोड देऊन शेतीत क्रांती घडवणाऱ्या लातूर जिल्ह्यातील चिंचोलीराववाडी येथील प्रयोगशील महिला शेतकरी संजिवनी अंगद नागमोडे यांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राज्य शासनाच्या कृषी विभागाचा 'जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०२४' प्रदान करण्यात आला. नुकतेच वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे झालेल्या या कृषि पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती नागमोडे यांनी आपल्या शेतात दूध उत्पादन, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांसारख्या कृषीपूरक व्यवसायांची यशस्वी सांगड घालत फळपिके व चारा पिकांची लागवड केली असून, याद्वारे त्यांनी नैसर्गिक शेतीवर विशेष भर दिला आहे. जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे टाळून त्या शेणखतासह इतर सेंद्रिय निविष्ठांचे उत्पादन व वापर स्वतःच्या शेतावरच करतात. शेतातील आणि गोठ्यातील टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेतावर बायोगॅस संयंत्र, गांडूळ खत निर्मिती, अझोला उत्पादन आणि कंपोस्ट खताचा प्रभावी वापर करून जमिनीची सुपीकता सातत्याने टिकवून ठेवली आहे. बायोगॅस निर्मितीमुळे त्यांच्या स्वयंपाकाची उत्तम सोय झाली असून, त्यातून निघणाऱ्या स्लरीचा वापर त्या शेतात दर्जेदार सेंद्रिय खत म्हणून करतात. पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर करण्यासाठी त्यांनी संपूर्ण शेतात प्रामुख्याने ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला असून, सिंचनाच्या शाश्वत सोयीसाठी सामूहिक व वैयक्तिक शेततळे, कुपनलिका आणि विहीर यांसारख्या जलस्रोतांची उभारणी केली आहे. पिकांवरील नैसर्गिक पद्धतीने कीड व रोग नियंत्रणासाठी त्या केवळ जैविक घटकांवर भर देतात, ज्यासाठी कृषी विज्ञान केंद्र लातूरकडून मिळणाऱ्या जैविक कीटकनाशकांसह दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्काचा वेळोवेळी वापर केला जातो. शासकीय योजनेच्या लाभातून त्यांनी ३ अश्वशक्ती क्षमतेचा सोलर पंप संच आणि गोबरगॅस संयंत्र बसवून शेतीमध्ये अपारंपरिक ऊर्जेचा प्रभावी वापर सुरू केला आहे. जमिनीच्या मशागतीची कामे वेळेवर आणि सुलभ व्हावीत म्हणून त्यांनी आधुनिक 'विडर' यंत्राचा यशस्वी वापर केला असून, 'ग्रास कटर'च्या साहाय्याने शेतातील गवताची कापणी करून त्याचे शेतातच आच्छादन (मल्चिंग) म्हणून पुनर्वापर केला जातो. केवळ कच्च्या मालाच्या उत्पादनावर न थांबता त्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगात मोठी भरारी घेतली असून, तेलबियापासून दर्जेदार तेल काढून 'तेलघाणा उद्योग' उभारला आहे व आकर्षक पॅकिंगमधून त्याची विक्री सुरू केली आहे. तसेच 'सोलर ड्रायर'चा वापर करून भाजीपाल्याची सुकवणी करून आणि शेतावर 'पॅलेट यंत्र' बसवून जनावरे, शेळ्या, बोकड व कोंबड्यांसाठी पौष्टिक खाद्य उत्पादन त्या स्वतःच करतात. आपल्या या सेंद्रिय शेतीमालाची विक्री करण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूब यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे प्रसिद्धी करून 'शेतकरी ते ग्राहक थेट विक्री' अशी यशस्वी साखळी निर्माण केली आहे. स्वतःच्या प्रगतीसोबतच ग्रामीण भागातील इतर महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी 'शाश्वत कृषी महिला शेतकरी गट' व 'कर्तव्य सोपान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची' स्थापना केली असून, या माध्यमातून महिला उद्योग उभारणी व नैसर्गिक शेती प्रसारासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत त्यांना 'जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०२४' देवून गौरविण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास