भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती करावी -जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती करावी
-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
• हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांचा आढावा
• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन
लातूर, दि. ०९ : भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, काय करावे याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तसेच सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिल्या. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांचा आढावा घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक टेकाळे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यावेळी उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे चार धक्के बसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. लातूर जिल्ह्यातही काही भागात हे धक्के जाणवले. अशा परिस्थितीत नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच या अनुषंगाने कोणत्याही अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. भूकंप अथवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तत्काळ योग्य मार्गदर्शन आणि माहिती देण्याची दक्षता घ्यावी. तसेच अशा परिस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले.
लातूर जिल्ह्यातील पाऊस व खरीप पेरण्यांची सद्यस्थिती, पाणी टंचाई उपाययोजना आदी बाबींचाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला आणि अनुषंगिक सूचना दिल्या. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी माहिती दिली.
लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत भूकंप सुरक्षा व आपत्कालीन मार्गदर्शक सूचना जारी
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने खालील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.
१. भूकंपाचा धक्का जाणवत असताना (काय करावे? / Do's)
घराच्या आत असल्यास: मजबूत टेबल, खाट किंवा बीम/कॉलमच्या खाली आसरा घ्या आणि टेबलचे पाय घट्ट पकडून ठेवा.
दरवाजाच्या चौकटीखाली किंवा कोपऱ्यात उभे राहा.
घराबाहेर असल्यास: तात्काळ मोकळ्या जागेत जा. उंच इमारती, विजेचे खांब, झाडे आणि जुन्या भिंतींपासून लांब राहा.
गाडी चालवत असल्यास: वाहन सुरक्षित व मोकळ्या जागेत रस्त्याच्या बाजूला थांबवा. पूल, ओव्हरब्रिज, विजेच्या तारा किंवा उंचावरून पडणाऱ्या वस्तूंच्या खाली वाहन थांबवू नका.
शांत राहा: स्वतः शांत राहा आणि इतरांनाही धीर द्या.
२. भूकंपादरम्यान (काय करू नये? / Don'ts)
• लिफ्टचा वापर करू नका: बाहेर पडण्यासाठी फक्त पायऱ्यांचा (Stairs) वापर करा.
• काच व जड वस्तूंपासून दूर राहा: खिडक्या, काचा, अस्ताव्यस्त टांगलेले फोटो फ्रेम्स आणि उंच कपाटांपासून लांब राहा.
• धावपळ/चेंगराचेंगरी करू नका: इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा पायऱ्यांवर एकाच वेळी गर्दी करू नका.
३. भूकंपानंतर (काय करावे व काय करू नये?)
काय करावे?
• आपत्कालीन सूचना ऐका: रेडिओ, टीव्ही किंवा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्सवरून मिळणाऱ्या सूचनांचेच पालन करा.
• संभाव्य आफ्टरशॉक्स (Aftershocks): मुख्य धक्क्यानंतर लहान-मोठे धक्के बसू शकतात, त्यामुळे सतर्क राहा आणि मोकळ्या जागेत राहा.
• कनेक्शन बंद करा: घरातील पाणी, वीज आणि गॅस सिलिंडरचे कनेक्शन तातडीने बंद करा.
• रस्ते मोकळे ठेवा: रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि बचाव पथकांच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी रस्ते मोकळे ठेवा.
• जखमींची पाहणी: कुटुंबातील व आसपासच्या लोकांची पाहणी करा आणि प्रथमोपचार द्या.
काय करू नये?
• आग लावू नका: काडी ओढू नका, मेणबत्ती लावू नका किंवा विजेची स्विचेस चालू/बंद करू नका (गॅस गळतीमुळे आगीचा धोका असतो).
• विजेच्या तारांना हात लावू नका: उघड्या किंवा तुटलेल्या विजेच्या तारांना स्पर्श करू नका.
• दूषित पाणी पिऊ नका: रोगराई पसरू नये म्हणून फक्त उकळलेले किंवा स्वच्छ उपलब्ध पाणीच प्या.
• क्षतिग्रस्त इमारतींमध्ये जाऊ नका: तडे गेलेल्या किंवा नुकसान झालेल्या इमारतींमध्ये पुन्हा राहण्यासाठी जाऊ नका.
• अफवा पसरवू नका: अनधिकृत संदेशांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका.
४. आपत्कालीन किट (Emergency Kit Ready Keep)
प्रत्येक कुटुंबाकडे खालील वस्तूंचे आपत्कालीन किट तयार असावे:
१. पिण्याचे पाणी व कोरडा सुकामेवा/अन्न
२. टॉर्च, अतिरिक्त बॅटऱ्या व रेडिओ
३. प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) व आवश्यक औषधे
४. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या छायाप्रती (Documents Backup)
आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक (Helpline Numbers):
📞 १०१ (अग्निशमन) | 📞 १०० / ११२ (पोलीस) | 📞 १०८ (वैद्यकीय आपत्कालीन सेवा)
*****
Comments
Post a Comment