कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची लातूर जिल्ह्यात विशेष अंमलबजावणी; अर्ज करण्याचे आवाहन
कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची
लातूर जिल्ह्यात विशेष अंमलबजावणी; अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. ०६ : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी लातूर जिल्ह्यात १९ जून २०२६ ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना ऑगस्ट २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आली असून, याद्वारे पीक काढणीनंतरची कृषी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक व विपणन यांना चालना मिळून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या २ कोटींपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत, तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते.
या योजनेअंतर्गत गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट आणि कस्टमर हायरिंग सेंटर यांसारख्या इतर कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट आणि कृषी क्षेत्रातील इतर संस्था पात्र लाभार्थी आहेत. या विशेष मोहिमेदरम्यान लातूर जिल्ह्यात व्यापक जनजागृती, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका आणि लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील पात्र शेतकरी व संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी, आत्मा, कृषी विभाग अथवा जवळच्या राष्ट्रीयीकृत व अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि कृषी उद्योजकांनी कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर आपले ऑनलाइन आवेदन सादर करावे, असे आवाहन लातूरच्या 'आत्मा' प्रकल्प संचालकांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment