लातूरमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम सुरू

लातूरमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम सुरू लातूर, दि. १० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यामध्ये मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी 'विशेष सखोल पुनरीक्षण' कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत सन २००२ च्या मतदार यादीशी सर्व मतदारांचे मॅपिंग करणे आवश्यक असून, जर मतदारांचे मॅपिंग झाले नाही तर त्यांना सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या वेळी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमोरील सुनावणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. या कामासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांना ०१ जुलै २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत पूर्णवेळ कामाकरिता कार्यमुक्त केले असून, अस्पष्ट फोटो गोळा करून अद्ययावत करणे व डीएसई नोंदींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदारांच्या घरोघरी भेट देऊन माहिती संकलन आणि डिजिटायझेशनची कामे पूर्ण करणार आहेत. मतदारांना या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सर्व बीएलओ रोज संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत आपापल्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार २० जून २०२६ ते २९ जून २०२६ या कालावधीत बीएलओ प्रशिक्षण व मतदार यादी छपाईचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर ०५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर ०५ ऑगस्ट २०२६ ते दि. ०४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना आपले दावे व हरकती दाखल करता येतील. हे प्राप्त झालेले दावे व हरकती ०५ ऑगस्ट २०२६ ते ०३ ऑक्टोबर २०२६ या नोटीस टप्प्यात निकाली काढले जातील. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत जास्तीत जास्त पात्र नागरिकांची नाव नोंदणी व्हावी आणि मतदार यादी अचूक व्हावी, यासाठी सर्व मतदारांनी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आपल्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओ यांची भेट घ्यावी आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास