इतर मागासवर्गीय समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी विविध कर्ज योजना; ऑनलाईन अर्जांचे आवाहन
इतर मागासवर्गीय समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी
विविध कर्ज योजना; ऑनलाईन अर्जांचे आवाहन
लातूर, दि. १० (जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व त्याअंतर्गत कार्यरत असलेल्या १४ महामंडळांच्या वतीने इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत १ लाखांपर्यंतची थेट कर्ज योजना, २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र उमेदवारांना घेता येणार आहे.
या सर्व कर्ज योजना पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाच्या असून, इतर मागास प्रवर्गातील इच्छुक व पात्र अर्जदारांनी नाव नोंदणीसाठी आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्यासाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे अनिवार्य आहे. या योजनांबाबत अधिक सविस्तर माहिती आणि मार्गदर्शनासाठी इच्छुक नागरिकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट मार्केट यार्ड, जुने डालडा फॅक्ट्री कंपाऊंड, लातूर' या पत्त्यावर किंवा ०२३८२-२५३३३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment