लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद सकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा - पोलीस अधीक्षक अमोल तांबे

लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद सकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा - पोलीस अधीक्षक अमोल तांबे · विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन · कृत्रिम बुद्धिमत्ता, वृत्त संकलन-संपादनाविषयी मार्गदर्शन लातूर, दि. ०१ (जिमाका): सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता ही सदृढ लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. सकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा मिळते आणि सामाजिक विकासाला गती प्राप्त होते, असे मत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी व्यक्त केले. लातूर येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढी सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेला प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे, मराठी भाषा तज्ज्ञ प्रा. दीपक रंगारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. सदृढ लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमे, शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे समाजाला मार्गदर्शन करतात. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, सत्य आणि अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर आहे. तसेच, नागरिकांना त्यांच्या कर्तव्यांबाबत जागरूक करण्याचे महत्त्वाचे कार्यही माध्यमांनी करणे आवश्यक आहे, असे पोलीस अधीक्षक श्री. तांबे यावेळी म्हणाले. पत्रकारांसाठी असलेल्या शासकीय योजना, सवलती आणि सुविधांबाबत माहिती मिळवून त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना कार्यशाळा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. पत्रकारांना शासकीय योजनांची माहिती देणे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वृत्त संकलन-संपादन यांबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता, असे त्यांनी सांगितले. विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मराठी भाषा तज्ज्ञ प्रा. दीपक रंगारी यांनी वृत्त संकलन आणि संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. मराठी प्रमाणभाषेचे नियम, शब्दांचा अर्थ, व्याकरणाचा योग्य वापर, तसेच मराठी भाषेच्या समृद्धीतील साहित्यिकांचे योगदान याविषयी त्यांनी माहिती दिली. क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व-दीर्घ उच्चार, तत्सम-तद्भव शब्दांचे नियम उदाहरणांसह समजावून सांगितले. पत्रकारांनी शब्दकोश आणि लेखनकोश यांचा वापर करून अचूक लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले. शब्दांचा वाक्यरचनेनुसार आणि संदर्भानुसार होणारा बदलही त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केला. विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके यांनी पत्रकारांसाठीच्या अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पत्रकारितेतील वापर, भाषा, कला, शास्त्र, संस्कृती यांच्याशी संबंध, तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रांमधील सध्याच्या एआय ऍप्सच्या वापराबाबत माहिती दिली. या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले, विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंपादक रेखा पालवे-गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन