इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना
लातूर, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन 2023-24 पासून लातूर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. यात मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100 अशा एकूण 200 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांचा समावेश आहे. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाते. या वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबर 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी त्या शहराचा स्थानिक रहिवाशी नसावा, जिथे शैक्षणिक संस्था आहे. विद्यार्थ्याने बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेतलेले असावे आणि बारावीत किमान 60 टक्के गुण असावेत.
सन 2025-26 साठी रिक्त जागांवरील वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबर 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. मुलींच्या वसतिगृहाबाबत माहितीसाठी गृहपाल श्रीमती वृषाली बडे (मो. 9028261183) आणि मुलांच्या वसतिगृहाबाबत माहितीसाठी गृहपाल तिरुके सुरज (मो. 8329447410) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, लातूर श्री. अभय अटकळ यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment