लातूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव; बैलपोळा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन
लातूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव;
बैलपोळा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन
लातूर, दि. २० : जिल्ह्यात सध्या लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, येत्या २२ ऑगस्ट रोजी साजरा होणारा बैलपोळा उत्सव साध्या आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत असून, पशुपालकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सद्यस्थिती अहवालानुसार, विविध तालुक्यांमध्ये एकूण ४११ जनावरे या रोगाने बाधित झाली आहेत. त्यापैकी २०० जनावरे उपचारानंतर पूर्णपणे बरी झाली आहेत, तर १७९ जनावरे अद्याप उपचाराधीन आहेत. दुर्दैवाने, ३२ जनावरांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. हा रोग जनावरांच्या त्वचेवर गाठी निर्माण करतो, ज्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येते. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध कठोर उपाययोजना राबवल्या जात आहेत, ज्यात बाधित क्षेत्रांमध्ये जनावरांची खरेदी-विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालकांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे, जो दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा हा उत्सव २२ ऑगस्ट रोजी आहे. मात्र, लंपी चर्मरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी आणि मिरवणुका टाळण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी दिले आहेत. बैलपोळा उत्सव गर्दी टाळून, मिरवणूक न काढता, स्वतःच्या गोठ्यातच साध्या आणि स्वच्छ पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामुळे रोगाचा प्रसार रोखता येईल आणि जनावरांचे संरक्षण होईल.
पशुपालाकांनी गोठ्याची काटेकोर स्वच्छता राखावी. शेण आणि लघवी योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. गोठ्यात ओलसरपणा, चिखल किंवा घाण टाळावी, जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही. गोचीड, गोमाश्या आणि डास यांसारख्या परोपजीवींच्या नियंत्रणासाठी नियमित फवारणी आणि निर्जंतुकीकरण करावे. गोठ्याभोवती साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे, जेणेकरून डासांची पैदास होणार नाही. बाधित गावांमध्ये आणि ५ किलोमीटर परिघातील क्षेत्रांमध्ये जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजारपेठा आणि जत्रांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बैलांच्या नाकावाटे तेल, अंडी किंवा इतर पदार्थ पाजू नयेत. यामुळे फुफ्फुसाला इजा होऊन निमोनिया होण्याचा धोका वाढतो. बैलांची शिंगे तासून त्यावर रंग किंवा पेंट लावू नयेत. यामुळे संसर्ग होऊन शिंगाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. जनावरांना शिजवलेले अन्न, गोड पदार्थ किंवा तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घालू नयेत. यामुळे पोटफुगी किंवा ऍसिडोसिससारखे आजार उद्भवू शकतात. जनावरांना स्वच्छ पाणी, हिरवा चारा आणि पौष्टिक आहार द्यावा, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. एखाद्या जनावरामध्ये गळ्यावर सूज, अंगावर गाठी, अशक्तपणा किंवा पाणी न पिणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
लंपी चर्मरोगाचा प्रसार थांबविण्यासाठी पशुपालकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. बैलपोळ्याच्या निमित्ताने गर्दी करणे, मिरवणूक काढणे किंवा जनावरांची देवाण-घेवाण टाळावी. आपल्या जनावरांचे रक्षण हेच आपले पहिले कर्तव्य आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे म्हटले आहे.
*****
Comments
Post a Comment