सावित्रीबाई फुले आधार आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सावित्रीबाई फुले आधार आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 29 (जिमाका): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 साठी सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेद्वारे महसुली विभाग शहर आणि क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी 43 हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना 38 हजार रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 32 हजार रुपये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी त्या शहराचा रहिवाशी नसावा, जिथे शैक्षणिक संस्था आहे. विद्यार्थ्याने बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेतलेले असावे आणि बारावीत किमान 60 टक्के गुण असावेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबर 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी, तर इतर पात्र विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी भगवान केंद्रे (मो. 9561109018) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन