लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर, दि. ०६ : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘टीबीमुक्त गाव माझी जबाबदारी - टीबीमुक्त ग्रामपंचायत’ अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होऊन लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.‘टीबीमुक्त गाव माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सलग दोन वर्षे क्षयरोगमुक्त राहिलेल्या ३२ ग्रामपंचायतींचा ‘सिल्व्हर अवॉर्ड’ (रौप्य पुरस्कार) देऊन गौरव करण्यात आला. हा गौरव सोहळा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. कौस्तुभ दासगुप्ता, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. अलका बांगर आणि सांख्यिकी अन्वेषक श्रीमती किरण चोथे आदी उपस्थित होते.जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रशासकीय स्तरावर क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना मोफत औषधोपचार दिले जात आहेत. तसेच, रुग्णांना पोषण आहार मिळावा यासाठी पोषण आहाराचे वाटप केले जाते. ग्रामपंचायत स्तरावर क्षयरुग्णांचा शोध, त्यांना पोषक आहार पुरवणे यासारख्या बाबींसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. सलग दोन वर्षे एकही क्षयरुग्ण आढळून न आलेल्या ३२ ग्रामपंचायतींचा सन्मान हा इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील २६९ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असून, सलग दोन वर्षे क्षयरोगमुक्त राहिलेल्या ३२ ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांची प्रतिमा आणि प्रमाणपत्र देऊन ‘सिल्व्हर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांनी केले. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन