गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा लातूर, दि. २५ : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असून, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आगामी गणेशोत्सवात वाहतूक नियम जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीळकंठ, अलका डाके, गणेश क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात लातूर शहर महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवावी. गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने प्रमुख ठिकाणी वाहतूक नियमांचे प्रबोधन करणारे देखावे आणि फलक लावण्याचे प्रयत्न करावेत. तसेच, जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर वेग मर्यादा, वळण रस्ते यांचे दिशादर्शक फलक योग्य ठिकाणी लावावेत. लातूर शहरातील प्रमुख चौकांतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका यांनी संयुक्त बैठक घेऊन लवकरात लवकर उपाययोजनांचा आराखडा सादर करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची आवश्यकता अधोरेखित केली. रस्त्यांवरील दुभाजकांवर वाढलेली झाडे आणि झुडपे वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत यासाठी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच, लातूर आणि हरंगुळ रेल्वे स्थानकांवर रेल्वे आल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत लातूर शहरातील रिक्षा थांबे आणि महामार्गावरील दिशादर्शक फलक आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन