लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी दोन दिवसीय विशेष मोहीम
लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी दोन दिवसीय विशेष मोहीम
* स्वातंत्र्यदिनी राबविला जाणार वृक्षारोपणाचा ‘मेगा ड्राईव्ह’
* ‘माझं लातूर, हरित लातूर’ अंतर्गत १७ ऑगस्ट रोजी ‘लातूर हरितोत्सव’
लातूर, दि. ०६ : जिल्ह्यात वृक्ष लागवडीला गती देण्यासाठी दोन दिवसीय विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यानुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात व्यापक स्वरूपात वृक्षारोपणासाठी ‘मेगा ड्राईव्ह’ आयोजित केला जाईल. तसेच, गतवर्षीप्रमाणे यंदाही १७ ऑगस्ट रोजी गंजगोलाई परिसरात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ‘माझं लातूर, हरित लातूर’ अंतर्गत ‘लातूर हरितोत्सव’ साजरा होईल. या दोन्ही उपक्रमांमध्ये नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात १५ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण मेगा ड्राईव्ह
स्वातंत्र्यदिनी राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेत सर्व प्रशासकीय विभागांचे तालुका, जिल्हा आणि ग्रामस्तरीय कार्यालये सहभागी होतील. शासकीय इमारतींचा परिसर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे नियोजन आहे. यासाठी सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या रोपवाटिकांमधून रोपे उपलब्ध करून दिली जातील. सर्व जिल्हास्तरीय विभागप्रमुखांनी याबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. तसेच, या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घराच्या अंगणात आणि परिसरात वृक्षारोपण करावे, तसेच वृक्षप्रेमी संघटना आणि संस्थांनी व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लातूर हरितोत्सव : सवलतीच्या दरात रोपांची विक्री
‘माझं लातूर, हरित लातूर’ संकल्पनेतून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने १७ ऑगस्ट २०२५ रोजी ‘लातूर हरितोत्सव २०२५’ आयोजित केला आहे. यानिमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंजगोलाई दरम्यान वृक्ष दिंडीचे आयोजन होईल. या उपक्रमात जिल्हा प्रशासनासह वृक्षप्रेमी संघटना आणि लातूर व्यापारी महासंघ सहभागी होणार आहे.
‘लातूर हरितोत्सव’दरम्यान गंजगोलाई ते हनुमान मंदिर चौक परिसरात खासगी रोपवाटिकांचे स्टॉल्स लावले जातील. यामध्ये औषधी वनस्पती, शोभिवंत झाडे, परसबागेसाठी योग्य रोपे, फळझाडे, फुलझाडे, सेंद्रिय खते, कुंड्या आणि इतर आवश्यक साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध असेल. शहरातील नागरिकांना घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये लावण्यायोग्य झाडांची माहिती दिली जाईल. तसेच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर लावण्यासाठी योग्य फळझाडांच्या निवडीपासून लागवडीपर्यंत मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय, महिला बचत गटांचे खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्सही उभारले जातील.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खासगी रोपवाटिकाधारकांनी वृक्ष प्रदर्शन आणि विक्री स्टॉल्सच्या नोंदणीसाठी लातूर कृषी विभागातील योगेश स्वामी (भ्रमणध्वनी क्र. ८४२१५०२९११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
Comments
Post a Comment