शैक्षणिक कामासाठी आवश्यक प्रमाणपत्रांच्या वितरणासाठी 18 जूनपासून विशेष शिबिरांचे आयोजन

 शैक्षणिक कामासाठी आवश्यक प्रमाणपत्रांच्या वितरणासाठी 18 जूनपासून विशेष शिबिरांचे आयोजन


लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांची माहिती

शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 10 हजार प्रमाणपत्रांच्या वितरणाचे उद्दिष्ट


लातूर, दि. 15 (जिमाका) : इयत्ता दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. असे दाखले विद्यार्थ्यांना शाळेतच किंवा जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तालुक्यात 18 जून ते 2 जुलै या कालावधीत 18 ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली.


महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी दरवर्षी महाराजस्व अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत दहावी, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी जातीचे प्रमाणपत्र, उत्त्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, ईडब्लूएस, एसईबीसी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर, तसेच इतर शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करण्यासाठी त्यांच्या शाळेच्या ठिकाणी किंवा निवासाचे जवळच विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते. 


लातूर तालुक्यात 18 जून ते 2 जुलै या कालावधीत 66 महा ई-सेवा केंद्रांमार्फत लातूर शहरातील 10 शाळा व इतर 8 महसूल मंडळात ही शिबिरे होणार आहेत. यासाठी महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. या शिबिरांच्या माध्यमातून किमान 10 हजार प्रमाणपत्रे वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून लातूर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिराला उपस्थित राहून दाखले प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीमती नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार श्री. तांदळे यांनी केले आहे.


लातूर तालुक्यात 18 ठिकाणी होणार विशेष शिबीर


महाराजस्व अभियानामध्ये 18 जून ते 2 जुलै 2024 या कालावधीत लातूर शहरातील श्री देशीकेंद्र विद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, राजस्थान विद्यालय, महात्मा बसवेश्वर विद्यालय, श्री केशवराज विद्यालय, दयानंद महाविद्यालय, कॉकसीट महाविद्यालय, शाहू महाविद्यालय, गोदावरीदेवी लाहोटी कन्या प्रशाला आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय या दहा शाळांमध्ये विशेष शिबीर होईल. तसेच याच कालावधीत ग्रामीण भागामध्ये कन्हेरी, गातेगाव, हरंगुळ बु., चिंचोली ब., बाभळगाव, कासारखेडा, मुरुड आणि तांदूळजा याठिकाणी विशेष शिबीर आयोजित केले जाईल. या कालावधीत शिबीर स्थळी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा