आंतरराष्ट्रीय योग दिनी हजारो लातूरकरांचा सामूहिक योगाभ्यास !
निरोगी आयुष्यासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे
· प्रभातफेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली योगाविषयी जनजागृती
लातूर, दि. 21 (जिमाका) : योग हा आपल्या देशाने जगाला दिलेला अनमोल ठेवा आहे. नियमित योगासनामुळे आपले तन आणि मन तांदरुस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्यकाने नियमितपणे योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होत्या. या कार्यक्रमात अंदाजे 6 हजार लातूरकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासान, लातूर शहर महानगरपालिका यांच्यासह पतंजलि योगपीठ, प्रजापिता ब्रह्मकुमारी, आर्ट ऑफ लिव्हिंग सुप्रभात ग्रुप, नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया, योगासन भारत आदींच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, लातृच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माले, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या नंदा बहेन, पतंजलि योगपीठाचे राम घाडगे, राजभाऊ खंदाडे, डॉ. अशोक सारडा, डॉ. कलमे यावेळी उपस्थित होते.
‘योग- स्वतःसाठी आणि समाजासाठी’ हे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे बोधवाक्य असून त्यानुसार प्रत्येकाने स्वतःसाठी योगाभ्यास केला पाहिजे, तसेच समाजातील इतरांनाही योगाचे महत्व सांगून योगाभ्यासासाठी प्रोत्साहित करून सामाजिक स्वास्थासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. योग ही एक जीवनशैली असून लहानपणापासूनच या जीवनशैलीचा अंगीकार केल्यास आपले पूर्ण आयुष्य संतुलित बनण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.
निरोगी आयुष्यासाठी ज्याप्रमाणे नियमित योगा आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवडीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने एक व्यक्ती, एक झाड या संकल्पनेतून आपल्या शेतात, घरासमोर, रिकाम्या जागेत एक तरी वृक्ष लावावा. यंदा वटपौर्णिमा आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस एकाच दिवशी आला असून महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन करण्यासोबतच वडाचे एक झाड लावून त्याची जोपासना करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.
प्रारंभी आयुष मंत्रालयाचे विकास पाटील यांनी प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उद्देश आणि योगाभ्यासाचे महत्व सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वडाच्या रोपाचे पूजन करण्यात आले. रुद्रा स्पोर्ट्सच्या चमूने यावेळी योगा नृत्य सादर केले. त्यानंतर योग मार्गदर्शक विष्णू भुतडा यांच्यासोबत उपस्थित सर्वांनी विविध योगासने केली. तसेच नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
प्रभातफेरीतून सांगितले योगाभ्यासाचे महत्व
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून योगाचे महत्व पटवून देण्यात आले. केशवराज माध्यमिक विद्यालय, देशिकेंद्र माध्यमिक विद्यालय, राजस्थान माध्यमिक विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, सरस्वती माध्यमिक विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय, सदानंद माध्यमिक विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, शारदा इंटरनॅशनल स्कूल, संत नामदेव माध्यमिक विद्यालय, यशवंत माध्यमिक विद्यालय, शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, जिजामाता कन्या प्रशालेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रभातफेरी आणि योगाभ्यासात सहभागी झाले होते.
*****
Comments
Post a Comment