कृषि विभागाने गावपातळीवर जावून उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे - क्रीडा मंत्री संजय बनसोडे

 कृषि विभागाने गावपातळीवर जावून उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे - क्रीडा मंत्री संजय बनसोडे


* उदगीर, जळकोट तालुक्यातील खरीप हंगाम तयारीचा आढावा 


लातूर, दि. १४ : खरीप हंगाम शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी, पिकांवरील कीड रोग नियंत्रणासाठी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या. उदगीर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या उदगीर विधानसभा क्षेत्रातील खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते.


जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव, कृषि विकास अधिकारी सुभाष . चोले, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीरचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जळकोटचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, कार्यकारी अभियंता सायस दराडे, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एन. काळे, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, जळकोटचे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम डावळे, यावेळी उपस्थित होते.


यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीलाच सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणीला सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे आणि रासायनिक खते उपलब्ध होणे आवश्यक आहे. बियाणे, खतांचा तुटवडा निर्माण होवू नये, तसेच बोगस बियाणे, खते विक्री होवू नये, यासाठी प्रत्येक कृषि सेवा केंद्रांवर एका कृषि सहाय्यकाची नेमणूक करावी. याबाबतीत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना श्री. बनसोडे यांनी दिल्या. तसेच उपलब्ध बियाणे, खतांची माहिती कृषि सेवा केंद्रांवर प्रसिद्ध करावी. भरारी पथकांनी सक्रीय राहून बियाणे, खते विक्रीतील गैरप्रकार रोखवेत असे, त्यांनी सांगितले.


बीजप्रक्रिया, पेरणीची योग्य पद्धती, कीड रोग व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी. विशेषतः सोयाबीन, तूर पिकांवरील कीड रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विभागाने गावोगावी शिबीर आयोजित करावे. त्यामुळे शंखी गोगलगाय, पिवळा मोजॅक आदीपासून पिकांचे रक्षण करणे शेतकऱ्यांना शक्य होईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देवून पिकांचे नुकसान झाल्यास कधी आणि कोणाला पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे, याविषयी मार्गदर्शन करावे, असे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.


प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र काळे, तालुका कृषि अधिकारी संजय नाबदे आणि आकाश पवार यांनी कृषि विभागामार्फत कृषि विभागाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी बियाणे, खते, पीक विमा या अनुषंगाने मुद्दे मांडले. या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना ना. बनसोडे यांनी दिल्या.


वीज पडून मृत्यू झालेल्या उदगीर तालुक्यातील होणी हिप्परगा येथील बळीराम व्यंकट मुसळे यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये सानुग्रह अनुदानाचे धनादेश नां. संजय बनसोडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच वीज पडून उदगीर तालुक्यातील ११ आणि जळकोट तालुक्यातील ५ जनावरे दगावली. संबंधित पशुपालकांनाही यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात मदतीचे धनादेश देण्यात आले.


शेतकऱ्यांना बियाणांचे वितरण; कृषि योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन


उदगीर तालुक्यातील २ हजार ७७५ शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल गळीतधान्य अभियानातून अनुदानावर सोयाबीनचे बियाणे मंजूर झाले आहे. या बियाणांचे ना. बनसोडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांवर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. सन २०२१ चा कृषि भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रगतशील शेतकरी श्याम सोनटक्के यांचा ना. बनसोडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.


शंखी गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रणासाठी चित्ररथाद्वारे होणार जनजागृती


खरीप हंगामात शंखी गोगलगायमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शंखी गोगलगायचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य उपायोजना करणे आवश्यक आहे. याबाबत माहिती देण्यासाठी कृषि विभागामार्फत चित्ररथाद्वारे गावोगावी जावून जनजागृती केली जाणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेला सुरुवात झाली.










Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा