जिल्हाधिकारी पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचतात तेव्हा...

 जिल्हाधिकारी पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचतात तेव्हा...


जिल्ह्यात यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर सुरु झालेल्या पेरणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधून बियाणांची उपलब्धता, खतांचा वापर आणि पेरणीची पद्धती याबाबत माहिती घेतली. यावेळी स्वतः टोकन यंत्र हाती घेवून पेरणीचा अनुभवही त्यांनी घेतला. तसेच बैलजोडीच्या सहाय्याने होत असलेल्या पारंपारिक पेरणीचाही त्यांनी अनुभव घेतला.

औसा तालुक्यातील लामजना, तांबरवाडी आणि खारोसा या गावांना भेट देवून जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पेरणीची पाहणी केली. कृषि विभागामार्फत पेरणीविषयी जनजागृती करण्यात आली असून प्रत्यक्ष पेरणी प्रसंगी शेतकऱ्यांकडून बीजप्रक्रिया, आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यंदा चांगला पाऊस होवून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

प्रारंभी लामजना येथील केशव शिवहार पाटील यांच्या शेतामध्ये जिल्हाधिकारी यांनी पेरणीची पाहणी केली. कृषि विभागाने केलेल्या मार्गदर्शनानुसार पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. श्री. पाटील यांच्या शेतामध्ये रुंद वरंबा सरी पद्धतीने टोकन यंत्राच्या सहाय्याने तूर पिकाची पेरणी करण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनीही पेरणीमध्ये सहभागी होत टोकन पद्धतीने पेरणी केली. तांबरवाडी येथील खंडू सूर्यवंशी यांच्या शेतात टोकन  यंत्राद्वारे करण्यात येत असलेल्या तूर पेरणीचीही त्यांनी पाहणी केली. तसेच टोकन यंत्रामुळे होणारे फायदे शेतकऱ्यांकडून जाणून घेतले.

टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी करण्यात येत असल्याने वेळेत, बियाणांची आणि श्रमाची बचत होत असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. कृषि विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना टोकन यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने खारोसा येथील शेतकरी बब्रुवान डोके यांच्या शेतात सुरु असलेल्या सोयाबीन पेरणीचीही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या फायद्याची माहिती तालुका कृषि अधिकारी यांनी यावेळी दिली. तसेच तालुक्यात बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. बीबीएम यंत्राद्वारे पेरणीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देवून यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

यावेळी बैलगाडीमध्ये बसून जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे खारोसा येथीलच शेषराव मारुती राऊतराव यांच्या शेतात पोहोचल्या. बैलाच्या सहाय्याने पारंपारिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या सोयाबीन पेरणीचीही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. काही शेतकऱ्यांच्या बांधावर यावेळी जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यावेळी उपस्थित होते.

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु