लातूर जिल्हा कारागृहातील बंदीजण चालविणार उपहारगृह !
लातूर जिल्हा कारागृहातील बंदीजण चालविणार उपहारगृह !
• जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते उद्घाटन
• जिल्हास्तरावर मोठ्या स्वरूपातील पहिलाच उपक्रम
• बंदीजणांच्या पुनर्वसनासाठी उपक्रम
लातूर, दि. 28 (जिमाका) : आपल्या हातून घडलेल्या अपराधाची शिक्षा बंदीजन कारागृहात भोगत असतात. मात्र, ही शिक्षा पूर्ण करून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर समाजात स्वाभिमानाने जगण्याची त्यांची इच्छा असते. शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आलेल्या अशा बंदीजणांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहामार्फत विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरावर पहिल्यांदाच लातूर जिल्हा कारागृह येथे बंदीजणांचे मोठ्या स्वरूपातील शृंखला उपहारगृह आणि लाँड्री सुरु करण्यात आली आहे. खुल्या कारागृहातील बंदीजण हे उपहारगृह आणि लाँड्री चालविणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते गुरुवारी या शृंखला उपहारगृह आणि लाँड्रीचे उद्घाटन करण्यात आले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अमित तिवारी, प्रभारी कारागृह अधीक्षक एस. एस. हिरेकर, तुरुंग अधिकारी मेघा बाहेकर यावेळी उपस्थित होते.
बंदीजणांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वप्रथम पुणे येथे येरवडा उपहारगृह येथे शृंखला उपहारगृह सुरु करण्यात आले. याच धर्तीवर लातूर जिल्हा कारागृहातही बंदिजणांचे उपहारगृह सुरु करण्यासाठी तत्कालीन कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी प्रस्ताव तयार करून त्यासाठी पाठपुरावा केला. यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निधीतून कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ उपहारगृह आणि लाँड्रीचे बांधकाम करण्यात आले आहे.
शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेल्या खुल्या कारागृहातील बंदीजणांकडून हे शृंखला उपहारगृह आणि लाँड्री चालविण्यात येणार आहे. यापूर्वीही काही जिल्ह्यांमध्ये असे उपहारगृह सुरु करण्यात आले असले तरी इतक्या मोठ्या स्वरुपातील जिल्हास्तरावरील पहिलेच उपहारगृह लातूर येथे सुरु झाले आहे. महाराष्ट्रीयन, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची चव याठिकाणी चाखायला मिळणार आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून बनविलेले बैठक कक्ष हे या उपहारगृहाचे वैशिष्ट्य आहे. तसेच याठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उपहारगृह आणि लाँड्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच येथील सर्व खर्च भागविला जाणार असून येथे काम करणाऱ्या बंदिजणांचे वेतनही यामधून दिले जाणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी उपहारगृह आणि लाँड्री येथे काम करणाऱ्या बंदीजणांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या उपक्रमामुळे समाजामध्ये मिसळण्यासोबतच व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगून या उपक्रमास मदत केल्याबद्दल बंदिजणांनी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आभार मानले. तसेच शिक्षा पूर्ण करून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चांगले जीवन जगण्याचा संकल्प केला.
बंदिजणांना आपली शिक्षा पूर्ण केल्यानंतर समाजात चांगले जीवन जगता यावे, यासाठी लातूर जिल्हा कारागृह प्रशासनाने सुरु केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. उपहारगृह, लाँड्रीसोबतच भविष्यात ऑफिस फाईल बायडिंग आणि शिलाई कामाचा उपक्रमही कारागृह प्रशासनामार्फत सुरु करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या. यावेळी त्यांच्या हस्ते कारागृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कारागृह परिसरात विविध फळझाडे लावून विविध फळांचा बगीचा तयार करावे, असे त्यांनी सांगितले.
***
Comments
Post a Comment