सौर ऊर्जेच्या वापरास प्राधान्य देण्याची गरज- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
लातूर, दि. १३ : सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला कृषीपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध होत आहे. भविष्यातील विजेची वाढती गरज लक्षात घेता सर्वांनीच सौर उर्जेच्या वापराला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे केले.
अहमदपूर येथे महावितरण कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या महावितरणच्या विविध विकासकामांचे लोकार्पण सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले उपस्थित होते.
अहमदपूर शहर आणि तालुक्यात मागील कालखंडात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात होत्या. या समस्यांची दखल घेऊन त्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तालुक्यात वीज उपकेंद्रांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याकरिता शासन सर्व स्तरावर कटिबद्ध व प्रयत्नशील आहे. तसेच अहमदपूर बस स्थानकाला आता चार्जिंग स्टेशन उपलब्ध झाले असून, लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी पर्यावरणपूरक चार्जिंग बसेस दाखल होणार आहेत. याचा मोठा फायदा संपूर्ण परिसरातील नागरिकांना व प्रवाशांना होणार आहे, असे सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले.
अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील, अहमदपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अय्याज शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अभियंता दिनेश पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी महावितरणच्या वतीने तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी कामांचा व विकासकामांचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चवळे व माधव माने यांनी केले.
****


Comments
Post a Comment