दिव्यांग बांधवांच्या अडचणी प्राधान्याने सोडवा - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
दिव्यांग बांधवांच्या अडचणी प्राधान्याने सोडवा
- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
लातूर, दिनांक १३ (जिमाका): जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या व अडचणींचे प्राधान्याने निवारण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी आणि संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते राजू गायकवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक बसवराज पैके, विशेष शिक्षक व्यंकट लामजने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार आता प्रत्येक सोमवारी ग्राम आणि तालुका पातळीवर दिव्यांगांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि 'अलिमको' मार्फत दिव्यांग बांधवांचे मोजमाप घेऊन त्यांना आवश्यक कृत्रिम अवयव पुरविले जातील. या प्रक्रियेला गती देण्यासाठी 'यु.डी.आय.डी.' संगणक ऑपरेटर यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, सत्यापन ॲप नोंदणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत सर्व ग्रामसेवकांना आवश्यक निर्देश दिले जाणार आहेत.
यासोबतच जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे काम वेगाने पूर्ण केले जाईल आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्राधान्याने मिळवून दिला जाईल. तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत पात्र दिव्यांग बांधवांचा 'अंत्योदय अन्न योजनेत' समावेश करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची अचूक नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची मागणी नोंदवण्यासाठी 'गुगल फॉर्म' वर नोंदणी करण्याचे निर्देश दिले, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिव्यांगांना वाहतूक परवाना मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करून परवाना देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
*****

Comments
Post a Comment