क्षयरोग रुग्णांची नि-क्षय प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

क्षयरोग रुग्णांची नि-क्षय प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड लातूर (जिमाका): जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरोग (टी.बी.) रुग्णांच्या अनिवार्य नोंदणी (टी.बी. नोटिफिकेशन) प्रक्रियेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टी.बी. फोरम, टीबीमुक्त भारत अभियान कमिटी, टीबी फोरम कमिटी बैठक नुकतीच झाली. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर, जिल्हा परिषद लातूरचे सहाय्यक गट विकास अधिकारी एस. एम. कानडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनीता पाटील, अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, कुष्ठरोग अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, डी.आर.सी.एच.ओ. डॉ. नितीन बोडके, आर.एम.ओ. डॉ. अशोक सारडा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. दासगुप्ता, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष हिंडोळे, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी, एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. राजकुमार तोष्णीवाल तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे वेळेवर निदान करणे, योग्य उपचार देणे, उपचारांमध्ये सातत्य ठेवणे, संपर्क तपासणी करणे तसेच रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे यासाठी क्षयरोग रुग्णांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ७ मे २०१२ रोजीच्या आदेशानुसार सर्व सार्वजनिक व खाजगी आरोग्य सेवा पुरवठादारांनी निदान झालेल्या किंवा उपचार सुरू असलेल्या प्रत्येक क्षयरोग रुग्णाची माहिती स्थानिक सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाकडे नोंदवणे बंधनकारक आहे. यामध्ये सरकारी व खाजगी रुग्णालये, क्लिनिक्स, नर्सिंग होम्स, प्रयोगशाळा, बिगर शासकीय संस्था आणि वैयक्तिक वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश होतो. तसेच २१ जुलै २०१५ च्या सुधारित अधिसूचनेनुसार वैद्यकीय व्यावसायिक, दवाखाने, रुग्णालये आणि नर्सिंग होम्स यांनी क्षयरोग रुग्णांची माहिती नोंदवणे अपेक्षित आहे. या नोंदणीनंतर रुग्णाच्या उपचाराचा पाठपुरावा करणे, समुपदेशन करणे, उपचारांचे काटेकोर पालन करून घेणे आणि संपर्क शोधणे यासारख्या सार्वजनिक आरोग्याच्या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी नि-क्षय प्रणालीमध्ये ही सर्व माहिती नोंदवली जाते. त्यामुळे निदान झालेल्या प्रत्येक क्षयरोग रुग्णाची नि-क्षय प्रणालीवर अनिवार्यपणे नोंदणी करावी. खाजगी रुग्णालयात क्षयरोगाचे उपचार सुरू असल्यास त्या रुग्णाची सर्व माहिती नि-क्षय प्रणालीमध्ये भरणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित संस्था किंवा रुग्णालयाने नि-क्षय आरोग्य सुविधा वापरकर्ता व खाजगी सेवा पुरवठादार नोंदणी पूर्ण करून अधिकृत प्रवेशप्रणालीचा (लॉगिन) वापर करावा. यामध्ये रुग्णाची वैयक्तिक माहिती, निदानाची माहिती, उपचारांची माहिती व वैद्यकीय तपासणी अहवाल अचूकपणे नोंदवावेत. रुग्णाची नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा क्षयरोग अधिकारी किंवा तालुका स्तरावरील राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम यंत्रणेशी सातत्याने समन्वय ठेवावा. रुग्णाच्या उपचारादरम्यान आवश्यक पाठपुरावा, उपचारांचे नियम पालन आणि संपर्क शोधण्याच्या कामात शासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करावे. क्षयरोग रुग्णांची नोंदणी न करणे, अपूर्ण माहिती देणे किंवा अनिवार्य प्रक्रियेचे पालन न करणे याबाबत सक्षम प्राधिकरणाकडून संबंधित कायदे, शासन आदेश व नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले . ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत