सावित्रीबाई फुले आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सावित्रीबाई फुले आधार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. १४ (जिमाका) : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती 'क' वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक) वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. तरी या योजनेअंतर्गत प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार असून, महसुली विभाग शहरातील व उर्वरित 'क' वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता म्हणून ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांसाठी ३८ हजार रुपये, तर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित केलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट वितरित करण्यात येणार आहे. तरी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, लातूर येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तसेच सक्षम प्राधिकरणाने दिलेले जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि विद्यार्थी ज्या ठिकाणी प्रवेशित आहे, त्या शहराचा अथवा तालुक्याचा मूळ रहिवासी नसावा. याशिवाय विद्यार्थ्याने बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेतलेले असणे आणि त्याला बारावीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले असणे अनिवार्य आहे. ऑनलाईन पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे उपरोक्त अटींची पूर्तता करणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती 'क' - धनगर समाज वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 'सावित्रीबाई फुले आधार योजने'साठी, तर धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी 'पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजने'साठी आपले अर्ज ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, लातूर येथे जमा करावेत. तालुका स्तरावरील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी देखील या योजनांचे अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी निरीक्षक भगवान केंद्रे (मो. नं. ९५६११०९०१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत