लातूर येथे महिला किसान दिवसनिमित्त १५ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
लातूर येथे महिला किसान दिवसनिमित्त
१५ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन
· महिला शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
लातूर, दि. १३ (जिमाका) : संयुक्त राष्ट्रांनी सन २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर महिला शेतकऱ्यांचे कृषी, अन्नसुरक्षा, ग्रामीण उपजीविका आणि शाश्वत विकासातील अमूल्य योगदान अधोरेखित करणे, तसेच त्यांचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याच्या मुख्य उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ ऑक्टोबर हा दिवस 'महिला किसान दिवस' म्हणून साजरा केला जात आहे.
त्याच अनुषंगाने लातूर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे जिल्हास्तरावर गुरुवारी, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता 'महिला किसान दिवस - २०२६' निमित्त एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत महिला शेतकऱ्यांनी स्वतः विकसित केलेले किंवा स्वीकारलेले स्थानिक कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण शेती पद्धती, आधुनिक कृषी अवजारे, जैविक निविष्ठा, फेरोमेन ट्रॅप्स (कामगंध सापळे), आणि हवामान बदलास अनुकूल असणारे विविध तंत्रज्ञान यांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरवही केला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला शेतकरी, शेतकरी गटांमधील महिला सदस्य आणि प्रगतशील महिला शेतकऱ्यांनी या जिल्हास्तरीय कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळा व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आत्मा’ प्रकल्पाच्या संचालक मनिषा उ. बांगर यांनी केले.
****
Comments
Post a Comment