छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला लातूर जिल्ह्यात सुरुवात;

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला लातूर जिल्ह्यात सुरुवात; • मार्च ते मे २०२६ दरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन लातूर, दि. ०२ : ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मार्च ते मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर विशेष एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश एकाच दिवसात नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. शिबिरांमध्ये उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवांमध्ये सातबारा अभिलेखातील चुका दुरुस्त करणे व डिजिटल सातबारा व आठ-अ उतारे तात्काळ पुरवणे, दीर्घकाळ प्रलंबित असलेले फेरफार प्रकरणे निकाली काढणे, उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र आदी दाखल्यांचे वाटप, अकृषिक (एनए) जमिनीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट रद्द आणि एकवेळचे अधिमूल्य भरण्याची तरतूद याबाबत जनजागृती, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पी.एम. किसान योजना, भूसंपादन प्रकरणातील नोंदी अद्ययावत करणे आदी बाबींचा समावेश आहे. शिबिरांचे प्राथमिक वेळापत्रक • ७ मार्च २०२६ – हरंगुळ बु. (लातूर), किनीथोट (औसा), पोहरेगाव (रेणापूर), औराद शहाजनी (निलंगा), किनगाव (अहमदपूर) इत्यादी • १४ मार्च २०२६ – बाभळगाव (लातूर), बेलकुंड (औसा), कारेपूर (रेणापूर), हलगरा (निलंगा), नळेगाव (चाकूर) इत्यादी • १० एप्रिल २०२६ – गातेगाव (लातूर), भादा (औसा), पानगाव (रेणापूर), शिरुर ताजबंद (अहमदपूर) इत्यादी • १७ एप्रिल २०२६ – कासारखेडा (लातूर), उजनी (औसा), पळशी (रेणापूर), निटूर (निलंगा), आष्टा (चाकूर) इत्यादी • ८ मे २०२६ – जिल्ह्यातील प्रमुख नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर शिबिरे (लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, चाकूर, उदगीर, जळकोट) इतर महसूल मंडळांच्या तारखा स्थानिक तहसीलदार कार्यालयामार्फत स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली असून, अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या महसूल संबंधित तक्रारी, अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरांमध्ये उपस्थित राहावे. या अभियानाचा लाभ घेऊन आपले प्रलंबित प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित