क्रीडा ई-प्रमाण : घरबसल्या प्रमाणपत्र मिळवा खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी प्रणालीवर अभिलेख उपलब्ध
क्रीडा ई-प्रमाण : घरबसल्या प्रमाणपत्र मिळवा
खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणासाठी प्रणालीवर अभिलेख उपलब्ध
लातूर, दि. 12 : महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा, यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही, ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल.
खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि मूळ डेटाशी ती जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय QR कोड असेल, जो स्कॅन करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी (उदा. MPSC, पोलीस भरती) प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील.
आगामी पदभरतीसाठी 'क्रीडा ई-प्रमाणपत्र' बंधनकारक
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी.
ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे, त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास, या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करुन घेणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धती
या प्रणालीअंतर्गत ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख 'क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात येत आहेत. या अभिलेखाद्वारे खेळाडू आपले ५ टक्के खेळाडू प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊ शकतात, यासाठी आवश्यक असणारा तपशील पुढील प्रमाणे.
खेळाडूंनी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य
ज्या खेळाडूंनी अधिकृत स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आहे. अशा सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://sports.maharashtra.gov.in/ भेट द्यावी.
संकेतस्थळावर सर्वात खाली आमच्या सेवा (Our Services) मध्ये ५% Reservation या टॅबमध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी पूर्ण करावी. या नोंदणीकरिता, वैयक्तिक माहिती व क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर अर्ज या सर्व बाबींसाठी खालील माहिती खेळाडूंनी तयार ठेवावी.
नोंदणीसाठी खेळाडूंनी आपल्या आधार-संलग्न (Aadhaar-linked) मोबाईल क्रमांकाचा आणि आयडीचा वापर करणे आवश्यक आहे. (Mobile No.). स्वताचा योग्य व दैनंदिन वापर ई-मेल आय.डी. (Email ID). आधार कार्ड पीडीएफ (Aadhar ID pdf format). क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्रावीण्य प्रमाणपत्र (Certificate of the Competition pdf format). ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे, त्यांनी तात्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करून घ्यावे.
स्पर्धेचे अभिलेख उपलब्ध नसल्यास 'Grievance' द्वारे करा अर्ज...
ज्या खेळाडूंची माहिती अभिलेखात किंवा प्रमाणपत्रे तांत्रिक कारणास्तव प्रणालीवर दिसत नसतील, तर support@kridaepramaan.org या ई-मेलवर आपली तक्रार आपल्याकडे असलेल्या क्रीडा प्रमाणपत्रासह नोंदवा. खेळाडूंनी आपले निवेदन सादर करताना खालील बाबीची पूर्तता करावी.
आपण सहभागी झालेल्या स्पर्धेचे अचूक नाव व वर्ष नमूद करावे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मूळ क्रीडा प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत निवेदनासोबत जोडावी. असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभाग स्तरावर त्या माहितीची शहानिशा करून सदर अभिलेख पोर्टलवर अद्ययावत करण्याची कार्यवाही केली जाईल.
अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अन्य खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्यानंतरत्याबाबतची माहिती त्वरीत याद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
कबड्डी, फेन्सिग, ट्रायथलॉन (२०२५ ची स्पर्धा), ज्युडो (२०२४ ची स्पर्धा), कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) ह्या स्पर्धाचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्याच खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी नोंदणी करावी, इतर अभिलेख देखील अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment