भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी
नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी
लातूर, दि. २४ : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलातील अधिकारी पदांच्या भरतीसाठी सीडीएस परीक्षेची तयारी करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे सीडीएस कोर्स क्रमांक ६५ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी २८ एप्रिल २०२६ रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.
या कोर्सचे आयोजन ४ मे २०२६ ते १३ मे २०२६ या कालावधीत नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
उमेदवारांनी मुलाखतीस येताना सैनिक कल्याण पुणे यांच्या संकेतस्थळावरून किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून सीडीएस-६५ कोर्सचे प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट भरून सोबत आणावी. उमेदवारांनी कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएस-युपीएससी) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उत्तीर्ण केलेले असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. तसेच एनसीसी स्पेशल एंट्री, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स, युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम (यूईएस) साठी एसएसबी कॉल लेटर असणे किंवा एसएसबी शिफारस यादीत नाव असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांच्याशी ईमेल (training.pctcnashik@gmail.com), दूरध्वनी (०२५३-२४५१०३२) किंवा व्हॉट्सअॅप (९१५६०७३३०६) या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment