छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर; लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर; लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. ०४ : राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात मंडळनिहाय एकदिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा उद्देश शेतकरी व सामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, तक्रारी व अर्ज गतीने निकाली काढणे, डिजिटल सेवांचा विस्तार करणे आणि जनतेला एकाच दिवशी सेवा पुरवणे हा आहे. याकरिता नागरिकांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
या शिबिरांतर्गत प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत मार्गदर्शन, अकृषक तरतुदींसंदर्भात सल्ला, डिजिटल सातबारा सुविधा, कमी-जास्त पत्रक तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे, तुकड्याच्या नोंदणीकृत दस्तऐवजाची नोंद कब्जेदार सदरी घेणे, इतर हक्कातील नोंद कमी करून भोगवटदार सदरी घेणे, संपादीत केलेल्या खाजगी व्यक्तीचे नाव कमी करून संपादीत यंत्रणेचे नाव भोगवटदार सदरी घेणे, अकृषी सातबारा वेगळा करणे, सामाजिक अर्थसहाय्याचे अर्ज स्वीकारणे व मंजुरी आदेश वाटप करणे अशा प्रमुख सेवांचा समावेश आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट (क्रमांक ९५२९०९३०२२) सुरू करण्यात आला आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून तसेच सोबत जोडलेल्या क्यूआर कोडद्वारे नागरिक आपल्या अडचणी, तक्रारी किंवा अर्ज थेट सादर करू शकतात. यामुळे शिबिरांमध्ये येण्यापूर्वीच पूर्वनोंदणी व मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे प्रक्रिया अधिक गतिमान होईल. तरी सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि शिबिरांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या प्रलंबित महसूली बाबींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
शिबिरांचे प्राथमिक वेळापत्रक
* ७ मार्च २०२६ – हरंगुळ बु. (लातूर), किनीथोट (औसा), पोहरेगाव (रेणापूर), औराद शहाजनी (निलंगा), किनगाव (अहमदपूर) इत्यादी.
* १४ मार्च २०२६ – बाभळगाव (लातूर), बेलकुंड (औसा), कारेपूर (रेणापूर), हलगरा (निलंगा), नळेगाव (चाकूर) इत्यादी.
* १० एप्रिल २०२६ – गातेगाव (लातूर), भादा (औसा), पानगाव (रेणापूर), शिरुर ताजबंद (अहमदपूर) इत्यादी.
* १७ एप्रिल २०२६ – कासारखेडा (लातूर), उजनी (औसा), पळशी (रेणापूर), निटूर (निलंगा), आष्टा (चाकूर) इत्यादी.
* ८ मे २०२६ – जिल्ह्यातील प्रमुख नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर शिबिरे (लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, चाकूर, उदगीर, जळकोट)
***
Comments
Post a Comment