नागरिकांनी परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स व खोट्या ई-चलन लिंक्सपासून सावध राहावे

नागरिकांनी परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स व खोट्या ई-चलन लिंक्सपासून सावध राहावे लातूर, दि. ०५ : अलीकडच्या काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांबाबत बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल ॲप्स (APKs) तसेच मोबाईल एसएमएस, व्हॉट्सॲपद्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंक्सद्वारे मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होत आहे. यामुळे वाहन चालक व मालकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच त्यांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व वाहन चालक व मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा. परिवहन विभागाची सर्व अधिकृत संकेतस्थळे gov.in ने समाप्त होतात. .com, .online, .site, .in अशा डोमेन असलेल्या कोणत्याही वेबसाइट्स उघडू नयेत.काही वेळा वाहनावर बाकी असलेल्या दंडाची त्वरित भरपाई करण्याची धमकी देऊन अनधिकृत लिंक पाठविल्या जातात. “DL (ड्रायव्हिंग लायसन्स) सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” असे संदेश फसवणूक करणाऱ्यांकडून पाठविले जाऊ शकतात. आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून कधीही व्हॉट्सॲप किंवा इतर मोबाईल ॲप्सद्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी. तसेच “RTO Services.apk”, “mParivhan_Update”, “eChallan_Pay.apk” अशा अनधिकृत APK ॲप्स किंवा लिंक्स डाउनलोड करू नयेत, कारण त्याद्वारे OTP, बँकिंग माहिती व मोबाईलमधील इतर संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. नागरिकांना कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ नॅशनल सायबर क्राइम पोर्टल https://www.cybercrime.gov.in वर, सायबर फसवणूक हेल्पलाइन 1930 वर किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.सर्व वाहन चालक, मालक व नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहून योग्य दक्षता घ्यावी. या बाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा वाहतूक विभागाशी संपर्क साधावा, असे मुंबई सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. परिवहन विभागाची अधिकृत संकेतस्थळे वाहन नोंदणी सेवा (वाहन) : https://vahan.parivahan.gov.in ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (सारथी) : https://sarthi.parivahan.gov.in परिवहन सेवा : https://www.parivahan.gov.in ई-चलन पोर्टल : https://echallan.parivahan.gov.in *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित