ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे
ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे
• औसा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद
लातूर, दि. १४ : ग्रंथ वाचनाने माणसाचे मस्तक समृद्ध होते आणि समृद्ध झालेले मस्तक कोणापुढेही सहज नतमस्तक होत नाही, हा महापुरुषांचा विचार आजच्या डिजिटल युगात रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार विक्रम काळे यांनी केले. औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित दोन दिवसीय लातूर जिल्हा ग्रंथोत्सव व ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे होते.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगीराज माने, ग्रंथ मित्र राम मेकले, प्रभाकर कापसे, प्राचार्य एस. एम. जलसगरे, संजय सूर्यवंशी, प्रा. अंकुश नाडे, शिवलिंग औटी, रविअप्पा चट्टे आणि राजकुमार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवा वर्गामध्ये वाचनाची ओढ निर्माण करण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वपूर्ण ठरतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी मराठवाड्यातील आपण सुमारे ३५० शाळा व महाविद्यालयांना प्रत्येकी ३६ हजार रुपयांची ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिल्याचे आ. काळे यांनी सांगितले. तसेच वाचकांना दर्जेदार ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देवून सार्वजनिक वाचनालयांनी या वाचन चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रंथ हे भविष्याचे दिशादर्शक: प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे
दरवर्षी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ग्रंथोत्सव आयोजित केल्यास सर्वसामान्य वाचकांना तालुक्याच्या ठिकाणी पुस्तके विकत घेण्याची संधी मिळते. ग्रंथोत्सवाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने येथील स्टॉलवरून किमान एक तरी पुस्तक विकत घेऊन जावे. ग्रंथ माणसाला प्रेरणा देतात, स्वाभिमानी बनवतात. जगभरातील अनेक महान व्यक्तींना ग्रंथांमुळे प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या कार्याला ग्रंथांमुळेच दिशा मिळाली. ग्रंथ हे पिढ्यानपिढ्याचे ज्ञान जपून ठेवतात, भूतकाळ व वर्तमानकाळ समजावून सांगतात आणि भविष्याचा दिशादर्शक म्हणून काम करतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी यावेळी केले.
ग्रंथ मानवी जीवनातील ताणतणाव दूर करतात. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सतत प्रयत्न होणे गरजेचे आहे. ज्ञान आपल्याला विवेकशील व सुसंस्कृत बनवते. ग्रंथ आणि ग्रंथालये हे ज्ञानाचे खरे भंडार आहेत. आजच्या डिजिटल काळातही ग्रंथांना पर्याय नाही. आजही ग्रंथ वाचनाची आवड जपणाऱ्यांची संख्या अधिक आहे, असे डॉ. रोडे यांनी सांगितले.’
उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांनी ग्रंथोत्सव आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना वाचन चळवळीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध प्रकाशकांचे स्टॉल, पुस्तक प्रदर्शन, चर्चासत्रे व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, वाचकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन पी. सी. पाटील यांनी केले, तर राजेंद्र कोरे यांनी आभार मानले.
ग्रंथोत्सवानिमित्त सकाळी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरंग गहिनीनाथ यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीत वारकरी वेशभूषा केलेला विद्यार्थ्यांचा चमू , मुक्तेश्वर विद्यालय, आजीम हायस्कूल, वीरभद्रेश्वर विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार जे. एम. वाघमारे, माजी आमदार गंगाधर पटणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासायला हवी : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
औसा येथे आयोजित दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सवाला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रंथोत्सवातील विविध पुस्तक दालनांची पाहणी केली. तसेच वाचक, नागरिक तसेच ग्रंथप्रेमींशी संवाद साधला. आजच्या डिजिटल युगातही ग्रंथ वाचन हे माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे, ज्ञानार्जनाचे आणि मानसिक स्वास्थ्याचे सर्वोत्तम साधन आहे. प्रत्येक व्यक्तीने, विशेषतः युवा पिढीने वाचनाची आवड जोपासली पाहिजे. ग्रंथ वाचनामुळे माणूस विवेकशील, सुसंस्कृत आणि स्वावलंबी बनतो. ताणतणाव कमी होतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. नागरिकांनी ग्रंथ दालनाला भेट देऊन किमान एक तरी पुस्तक खरेदी करावे. वाचन हा छंद नव्हे तर जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केल.
**





Comments
Post a Comment