लातूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून चार विशेष डिजिटल शेती शाळा; कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा पुढाकार

लातूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून चार विशेष डिजिटल शेती शाळा; कृषी विभाग व पाणी फाउंडेशनचा पुढाकार लातूर, दि. ३०: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) अभियान स्वरूपात राबवण्यात येणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपक्रमांतर्गत, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने हे प्रशिक्षण पार पडणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान ३० ते ४० शेतकऱ्यांनी यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. पाणी फाउंडेशनद्वारे संचलित ही डिजिटल शेती शाळा एक प्रगत ऑनलाईन व्यासपीठ असून, याद्वारे तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त मार्गदर्शन झूम (Zoom) आणि युट्युब (YouTube) च्या माध्यमातून दिले जाणार आहे. या उपक्रमात कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, तसेच कृषी ताई व कृषी सखी यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. गावनिहाय नियोजन करून एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्रित उपस्थित राहावे, यासाठी कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे. या विशेष शेती शाळांचे वेळापत्रक चार भागांत विभागले असून, त्याचे सत्र निश्चित केलेल्या दिवशी सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. याची लिंक गावनिहाय व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या भागात १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, टोकण पद्धत, आंतरपीक आणि बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन होईल. दुसऱ्या भागात ८ एप्रिल रोजी बीजामृत, जिवामृत आणि दशपर्णी अर्क यांसारख्या जैविक व नैसर्गिक निविष्ठा निर्मितीवर भर दिला जाईल. तिसऱ्या भागात १५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन, सापळा पिके आणि मित्र कीटकांचा वापर यावर चर्चा होईल, तर चौथ्या भागात २२ एप्रिल रोजी भात शेती लागवडीचे आधुनिक तंत्र व यांत्रिकीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या डिजिटल शेती शाळेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित