भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. ०८ (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे, औसा, निलंगा, उदगीर, देवणी व चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह, अहमदपूर येथे मुलांची दोन व मुलींची दोन वसतिगृहे, तर रेणापूर येथे मुलांचे एक आणि जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह सुरू आहे. सदर वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन वेब लिंकचा वापर करावा.
जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून बिगर व्यावसायिक पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रवेश अर्ज भरता येईल. याशिवाय अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनाही वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरले असतील, त्यांनीही आता ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य असून, ऑनलाईन अर्ज न भरल्यास विद्यार्थी वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजनेच्या लाभास पात्र राहणार नाहीत. तसेच मागील वर्षी वसतिगृहात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचे १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा जागेअभावी वसतिगृहात प्रवेश निश्चित होणार नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत निवास व भोजन भत्ता ऑनलाईन पद्धतीने मंजूर करण्यात येईल. वसतिगृह प्रवेशासाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज थेट स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन वर्ग केले जातील; त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशाचा मुळ अर्जच भरलेला नाही, त्यांना स्वाधार योजनेचा स्वतंत्र अर्ज भरता येणार नाही व योजनेचा लाभही मिळणार नाही. तरी शासकीय वसतिगृहात प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी नवीन वेब लिंकचा वापर करून तसेच स्थानिक गृहप्रमुख व गृहपाल यांच्याशी संपर्क साधून आपले प्रवेश अर्ज वेळेत भरावेत, असे आवाहन लातूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment