स्थानिक जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या 'थाई मागुर' माशाचे संवर्धन आणि विक्री न करण्याचे आवाहन
स्थानिक जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या 'थाई मागुर' माशाचे
संवर्धन आणि विक्री न करण्याचे आवाहन
लातूर, दि. ०९ : विदेशी मागुर हा मासा भक्षक स्वरूपाचा असून तो भारतातील स्थानिक जैवविविधता, मत्स्यसंपदा आणि पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत घातक असल्याने नागरिकांनी, शेततळीधारकांनी व मत्स्य व्यावसायिकांनी या माशाचे संवर्धन, विक्री, साठवणूक आणि वाहतूक करू नये, असे आवाहन लातूर मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त कार्यालयाने केले आहे.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने २२ जानेवारी २०१९ च्या आदेशानुसार या माशावर पूर्णतः बंदी घातलेली असून केंद्र सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागानेही याच्या वापरावर बंदी लागू केली आहे. या आदेशानुसार थाई मागुरचे मत्स्यबीज संचयन करणे, संवर्धन करणे, उत्पादन घेणे, अवैध वाहतूक करणे किंवा आहारात वापर करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या माशाला वाढवण्यासाठी कुजलेले मांस आणि टाकाऊ पदार्थ वापरले जात असल्याने पाण्याच्या प्रदूषणासह परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते, तसेच हा मासा अजैविक कचरा खात असल्याने त्याच्या शरीरात पारा, शिसे आणि आर्सेनिक यांसारखे घातक जड धातू आढळतात, ज्यामुळे याचे सेवन करणाऱ्यांना कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
या सर्व धोक्यांची दखल घेऊन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या नियंत्रणाखाली या मासळीचे साठे नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जिल्ह्यात कुठेही थाई मागुर माशाची विक्री, अवैध वाहतूक किंवा मत्स्य साठा आढळल्यास नागरिकांनी तात्काळ सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. नागरिक यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२३८२-२९९३२६ किंवा acf_ltr@yahoo.com व laturacf@gmail.com या ई-मेल आयडीवर माहिती देऊ शकतात.
*****
Comments
Post a Comment