महापुरुषांचे विचार आणि कार्यापासून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी - सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
महापुरुषांचे विचार आणि कार्यापासून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी
- सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
• अहमदपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन
लातूर, दि. ०६ : महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके ही आपल्या सर्वांना सतत उर्जा व प्रेरणा देतात. नव्या पिढीने महापुरुषांचे विचार आणि कार्य यांचा आदर्श आपल्या जीवनात घेतला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक प्रखर राष्ट्रभक्त होते, तसेच त्यांचे लेखक म्हणून साहित्य क्षेत्रातही अत्यंत मोलाचे योगदान आहे. त्यांचे विचार आणि कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे उद्गार सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी काढले.
अहमदपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन सहकारमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष ॲड. स्वप्निल व्हत्ते, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, जिल्हा परिषद सदस्य अश्विन नागराळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, नगरसेवक निलेश मजगे, अमित रेड्डी, निखिल कासनाळे, प्रशांत भोसले, आशिष तोगरे, अजिंक्य चामे, किशोर कोरे, राहुल शिवपुजे, मुजम्मिल सय्यद, सदामा शेख, युसुफ सय्यद, अभियंता दहिफळे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकाचे अध्यक्ष धनंजय जोशी, सचिव मेजर मधुसूदन चेरेकर यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक सुशोभीकरणाची मागणी होत होती. याची दखल घेत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तरुणांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशनिष्ठा व विचार कायम स्मरणात राहावेत, यासाठीच या चौकाचे सुशोभीकरण करण्यात येत असल्याचे सहकारमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. तसेच, सध्या पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी त्यांनी खचून जाऊ नये, राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमात नगराध्यक्ष स्वप्निल व्हत्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकाचे अध्यक्ष धनंजय जोशी, सचिव मेजर मधुसूदन चेरेकर, मधुकर धडे, दिलीप शास्त्री, अनिकेत काशीकर, शरद जोशी, सुभाष पाटील, यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी केले. ***
Comments
Post a Comment