'कुणबी प्रमाणपत्रा'साठी लातूर जिल्ह्यात १० ते १७ सप्टेंबर दरम्यान महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन

'कुणबी प्रमाणपत्रा'साठी लातूर जिल्ह्यात १० ते १७ सप्टेंबर दरम्यान महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन लातूर, दि. ०८ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने या विशेष मोहिमेचे नियोजन केले असून, अंतर्गत प्रत्येक महसूल मंडळात संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांचा दिनांक, वेळ व ठिकाण याची माहिती नागरिकांना वेळेत मिळावी यासाठी गावपातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर सूचना प्रसिद्ध करणे तसेच स्थानिक व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आयोजित शिबिरांमध्ये जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि परिपूर्ण अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन व मदत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना जलद गतीने प्रमाणपत्र वितरीत व्हावे यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार असून, कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व मोहिमेचे दैनंदिन संनियंत्रण केले जाणार असल्याने सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावर सूक्ष्म नियोजन करून आदेशाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी आपल्या क्षेत्रातील महसूल मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष शिबिरांना भेट देऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत