लातूर तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई; ३ हायवा जप्त करून साडेसात लाखांचा दंड प्रस्तावित
लातूर तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई;
३ हायवा जप्त करून साडेसात लाखांचा दंड प्रस्तावित
लातूर, दि. ०८ (जिमाका) : लातूर तालुक्यामध्ये अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कारवाई केली आहे. लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि पोलीस विभागाच्या पथकाने ०७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.२० वाजेच्या सुमारास मौजे खंडापूर येथील पाझर तलावातून अवैध गौणखनिज मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ३ हायवा वाहनांवर धडक कारवाई केली.
या संयुक्त कारवाईदरम्यान वाहन मालक महादू ढोरमारे यांच्या मालकीचे MH-16,AY-9827, MH-24,BW-8080 आणि MH-24, CA-8080 या तिन्ही हायवा वाहनांना जप्त करण्यात आले असून, प्रत्येक वाहनावर प्रत्येकी २,५०,००० रुपये याप्रमाणे एकूण ७,५०,००० रुपयांची दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या तिन्ही प्रकरणात लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई वेगाने सुरू आहे.
लातूर तालुक्यात आतापर्यंत अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकप्रकरणी एकूण २२ प्रकरणांत धडक कारवाया करण्यात आल्या असून, त्यापैकी २५,३६,७८४ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ६ प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लातूर तालुक्यातील कोणत्याही नागरिकाने किंवा व्यावसायिकाने विनापरवाना अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करू नये, अन्यथा असा प्रकार आढळल्यास संबंधित दोषींवर अधिक कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी कळविले आहे.
****


Comments
Post a Comment