जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा1897 अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक आदेश लागू

* महानगरपालिका व सर्व नगरपालिका क्षेत्रातील सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालय 31   
   मार्च पर्यंत बंद राहणार
* 10 वी, 12 वी व विश्वविद्यालयाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील
* जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा व तरणतलाव 31 मार्च पर्यंत बंद
* नागरिकांनी न घाबरता सतर्क राहावे व प्रशासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे

लातूर, दि.15:- राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. यानुसार करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांसाठी पुढील आदेश होईपर्यंत परवानगी मागण्यात येऊ नयेत तसेच यापूर्वी दिलेल्या परवानगी रद्द समजाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
         त्याचप्रमाणे जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या,  सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय , व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग  31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात येतील.त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचनाही संबंधित संस्थाप्रमुखास देण्यात आल्या आहेत,असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कळविले आहे. या सर्व सूचना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
         तसेच साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व चित्रपट गृहे, व्हिडिओ गृहे, तरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृह व इतर करमणुकीची ठिकाणे 31 मार्च 2020 पर्यंत  बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. त्याप्रमाणेच लातूर जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल व मॉल मधील सर्व दुकाने, आस्थपना( अत्यावश्यक किराणा सामान, दूध ,भाजीपाला, औषधी दुकाने व अन्य जीवननावश्यक वस्तू वगळून) साथरोग  प्रतिबंधक कायद्यानुसार दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
    कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे. या विषाणूंचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु