ग्रंथप्रेमी नागरिकांसाठी ग्रंथोत्सव ही एक पर्वणीच
                            -राज्यमंत्री संजय बनसोडे
*राज्यात  ग्रंथालयाबाबत लवकरच धोरण जाहिर होणार
*लातूरला  पाणी पुरवठयासाठी अर्थ संकल्पात 200 कोटीची तरतूद
*आष्टामोड ते उदगीर  रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार 
*नागरीकांनी पर्यावरण पुरक होळी साजरा करण्याचे आवाहन


     लातूर,दि.7:- ग्रंथ वाचनातून विचार व विचारातून आचरण घडत असल्यामुळे प्रत्येक जिल्हयात प्रतिवर्षी ग्रंथोत्सव साजरा केला जात आहे. ग्रंथोत्‍सवात शेकडो विषयावरील हजारो पुस्तके ग्रंथप्रेमी नागरिकांसाठी सहज उपलब्ध होत असतात. त्यामुळे अशा वर्गासाठी ग्रंथोत्सव एक पर्वणीच ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग,ग्रंथालय संचालनालय,मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने टाऊन हॉल येथे आयोजित लातूर ग्रंथोत्सव-2019 उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते  बोलत होते. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून इतिहास संशोधक प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, जेष्ठ साहित्यीक प्राध्यापक फ.म.शहाजिंदे, प्रा.सतिष यादव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की ,ग्रंथेात्सव आयोजनामुळे वाचक वर्गासाठी ज्ञानाचा खजिनाच खुला झालेला आहे. राज्यातील ग्रंथालयाच्या समस्या बाबतीत महाविकास आघाडीचे सरकार लवकरच धोरण जाहीर करणार आहे. ग्रंथालयाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करुन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
        लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून लातूरला उजनीचे पाणी आणण्यासाठी अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. आष्टामोड ते उदगीर रस्त्याचे काम काही दिवसातच चालू होणार आहे. यासाठी अर्थ संकल्पात 220 कोटीची निधी मंजूर केला आहे.लातूर येथे लवकरच विलासराव देशमुख स्मृती भवन उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्लाष्टीक वापरावर बंदी घातलेली असून आपण सर्वांनी लातूर जिल्हयात आज पासून प्लाष्टीक वापरु नका म्हणून लोकचळवळ उभे करावी व पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी केले.
      इतिहास संशोधक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यावेळी म्हणाले की, माणसाच्या संपूर्ण  वाटचालीमध्ये ग्रंथाचे अगळेवेगळे स्थान आहे.ग्रंथ वाचनामुळे माणूस सुसंक्रत,सभ्य बनत आहे. आपल्या देशात 54 हजार ग्रंथालये असून महाराष्ट्रात 12 हजार 149 ग्रंथालये आहे.यापुढे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील लग्न समारंभात ग्रंथ किंवा पुस्तक भेट म्हणून दयावी.पुस्तकाच्या माध्यमातून माणसाची उंची मोजता येते. यासाठी प्रत्येकानी ग्रंथ वाचन करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जेष्ठ साहित्यीक फ.म. शहाजिंदे प्राध्यापक सतीष यादव यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
         कार्यक्रमास जिल्हयातील ग्रंथ प्रेमी, वाचक वर्ग, जेष्ठ पत्रकार, ग्रंथालय समन्वय  समितीचे पदाधिकारी, महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी केले.सुत्रसंचालन प्रा.शैलेजा करंडे व पी.सी.पाटील यांनी केले असून आभार हरीचंद्र डेंगळे यांनी मानले.
*ग्रंथदिंडी :-
कार्यक्रमाच्या प्रारंभी जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते टाऊन हॉल पर्यंत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रंथ दिंडीत जेष्ठ साहित्यीक फ.म.शहाजिंदे ,प्रा.सतीष यादव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजभारे, राजमाता जिजामाता विद्यालय, अक्षरवंदन प्राथमिक विद्यालय,व नंदादिप प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यर्थींनींनी व मंदार हरंगूळ (बु.) ,येथील विठ्ठल रुकमिनी महिला भजनी मंडळाने सहभाग नोंदवीला.
*लोकराज्य स्टॉल चे उद्घाटन:-
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने ग्रंथोत्सवा मध्ये उभारण्यात आलेल्या लोकराज्य व प्रकाशने स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत सर्वसाधारण योजना व सामाजिक न्याय विभाग योजना तसेच मुद्रा योजनाच्या हजारो घडीपत्रिका, भित्ती पत्रिके, दिनदर्शिका, स्टिकर व माहिती पुस्तिका चे मोफत वितरण करण्यात आले.
     या ग्रंथोत्सवात  लातूर शहर व जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील अनेक पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल लागलेले आहेत तसेच शासकीय ग्रंथालयाचा ही स्टॉल लागलेला आहे तरी नागरिकांनी येथे भेट  द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

                                                                *****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा