बालकामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहिम
लातूर,दि.20:- महाराष्ट्र राज्यातून बाल मजुरी या प्रथेचे समुळ उचाटन करुन बाल मजुरांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ करुन घेणे व आवश्यकता असल्यास त्यांचे कुटुंबाचे पुर्नवसन करणे बाल मजुरांची मालकांच्या तावडीतुन मुक्तता करण्याच्या उद्देशाने उद्योग उर्जा कामगार विभाग, अन्वये प्रत्येक जिल्हयात जिल्हा दंडाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कृती दल गठीत करण्यात आलेले आहे.
दिनांक 17 मार्च 2020 ते  23 मार्च 2020 या कालावधीत बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान राबविण्यात येत असून जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्थानीक केबल ऑपरेटर्स मार्फत प्रसिध्दी, हॉटेल, ढाबा,मॉल्स, दुकाने, ऑटोरिक्षा इत्यादी ठिकाणी पोस्टर तसेच स्टिकर्स लावण्यात येत आहेत. तसेच लातूर जिल्हा बाल कामगार मुक्त करण्याचा अनुषंगाने त्यास जनजागृती करण्यात येत आहे.
बाल व किशोर वयीन कामगार (प्रतिबंध व नियमन ) अधिनियम ,1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात / प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्ष पूर्ण परंतु 18 वर्ष पुर्ण न झालेले किशोर वयीन मुलांना धोकादाय उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे व जर मालकाने /नियोक्त्याने बाल अथवा किशोर वयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यांस 6 महिने ते 2 वर्षापर्यंत  कारावास किंवा रु. 20,000/- ते 50,000/- पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होवु शकतात.
या शिवाय शासकीय कर्मचाऱ्यांना 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यासाठी शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग क्र. सीडीआर-1097/प्रकरण 21-97/अकरा, दि.1 डिसेंबर, 1997 अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मध्ये नवीन नियम क्र. 27-ए समाविष्ट करण्यात आलेला आहे.
दिनांक 17 ते 23 मार्च 2020 या कालावधीत बाल कामगार प्रथेविरुध्द राबविण्यात यावयाच्या कार्यक्रमा अंतर्गत विटभट्टी मालक/ चालकांकडून बाल कामगारांना कामावर न ठेवणे बाबत हमीपत्र लिहुन घेणे, दुकाने व अस्थापना येथे बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत स्टिकर प्रदर्शित करणे, स्थानिक केबल नेटवर्क व्दारे बालकामगार प्रथेविरुध्द विनामुल्य संदेश देणे, पत्रके वाटणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. बाल कामगार कामावर ठेवणे हा दंडनिय गुन्हा असल्याने कोणीही बाल कामगारास कामावर ठेवू नये. असे अवाहन जिल्हाधिकारी , लातूर तसेच सहाय्यक कामगार आयुक्त , लातूर यांचे वतीने करण्यात येत आहे.
                                        ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु