साथरोग प्रतिबंधात्मक आदेशानुसार
सनियंत्रण समिती स्थापना

लातूर,दि.19:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात आली आहे.
        जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हयातील सर्व शासकीय व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय, अंगणवाडी, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे येथे कार्यरत असलेले शिक्षक, प्राध्यापक ,अंगणवाडी सेविका, आशा तसेच आरोग्य कर्मचारी यांनी आपआपल्या शैक्षणिक संकुल परिसरात / कार्यक्षेत्राच्या गावामध्ये उपस्थित राहून तेथील स्थानिक नागरिकांच्या घरोघरी जाऊन लहान-लहान समुहास (कमाल मर्यादा 10 नागरिकास) कोरोना विषाणू  संसर्गाच्या प्रतिबंधासाठी पुढील  प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देत आहे.
        आरोग्य विभागाच्या अधिनस्त आरोग्य पर्यवेक्षक / आरोग्य सेवक/ आशा इत्यादींच्या मार्फत घरोघरी जाऊन गृहस्थांच्या आरोग्याची तपासणी करावी. तपासणीअंती ज्यांना सर्दी, खोकला, ताप असल्याचे आढळून आल्यास संबंधितांची  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तपासणी करुन घ्यावी. शालेय शिक्षकांनी घरोघरी जाऊन कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी प्रबोधन व प्रात्याक्षिक करुन घ्यावेत. उदा. स्वच्छ हात धुण्याचे प्रात्याक्षिक, कोरोना विषाणू संसर्गाविषयी माहिती पत्रके (Pamphlet Leaflet) वितरीत करणे व इतर अनुषंगीक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे.
        नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे तसेच गर्दी होईल असा कोणताही सार्वजनिक स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करु नये अशा सूचना घरोघरी जाऊन दयाव्यात. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप तसेच श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने नजीकच्या रुग्णालयात आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी. आजारी व्यक्तीच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याबाबत सूचना दयाव्यात.
        प्रत्येक नागरीकांनी आपले हात प्रत्येक तासाला स्वच्छ धुवावेत तसेच प्रत्यकाने सोबत स्वच्छ हातरुमाल ठेवून त्याचा वापर करण्याबाबत प्रात्यक्षिक दाखवून सूचित करावे.नागरिकांनी अनावश्यक प्रवास करणे टाळावे. त्याचबरोबर आपले कोणी नातेवाईक परदेशातून किंवा परराज्यातून परत आलेले असल्यास त्यांची तातडीने नजीकच्या रुग्णालयात तपासणी करुन घेण्याबाबत सूचना दयाव्यात. आपल्या घरचा व जवळचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत सूचित करावे.
        सदर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी व यावर सनियंत्रण करण्यासाठी पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.
        अधिकारी व समिती मधील भुमिका पुढील प्रमाणे – तहसीलदार अध्यक्ष, गट विकास अधिकारी सदस्य सचिव, स्थानिक पोलीस निरीक्षक सदस्य, मुख्याधिकारी न.प./न.पं. सदस्य, बालविकास प्रकल्प अधिकारी सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी सदस्य , गट शिक्षणाधिकारी सदस्य असतील.
        सदर समितीने उपरोक्त सूचनांप्रमाणे कार्यवाही होत असल्याबाबत खात्री करावी. तसेच याबाबत दररोज आढावा घेवून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. आदेशात दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत. सदरहू आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी पत्राव्दारे कळविले आहे.

                                                                              ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा