कर्जमुक्तीची दुसऱ्या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांनी
आधार प्रमाणीकरण करून घ्यावे
                            -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

* जिल्ह्याच्या 900 गावातील 51 हजार शेतक-यांच्या नावांची यादी प्रसिद्ध

लातूर, दि.3:-महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी 28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. कर्जमुक्तीच्या या दुसऱ्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील 900 गावांमधील 51 हजार 440 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी यादीत नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी संबंधित बँक अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
       लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात बाभळगाव व आष्टा या दोन गावाचा समावेश करण्यात आलेला होता. तर दुसऱ्या टप्प्यात महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत 900 गावांमधील 51440 शेतकऱ्यांचा समावेश झालेला आहे. या गावांमधील 7 हजार 42 शेतकऱ्यांनी 28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2020 पर्यंत  आधार प्रमाणीकरण करून घेतलेले आहे. तरी या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी यादीत प्रसिद्ध झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन गावातील बँकेच्या शाखेत अथवा आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेतल्यास त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ तात्काळ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर 24 तासाच्या आत संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्ती योजनेची रक्कम जमा होत आहे.
तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्वरित आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

                                           *****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा